गुवाहटी वन-डे सामन्यात भारताने विंडीजवर 8 गडी राखून मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सलामीवीर रोहित शर्माने झळकावलेलं दीड शतक आणि कर्णधार कोहलीच्या धडाकेबाज शतकी खेळीमुळे भारताने विंडीजने दिलेलं 323 धावांचं आव्हान सहज पार केलं. विराट आणि रोहित शर्मामध्ये दुसऱ्या विकेटसाठी 246 धावांची भागीदारीही झाली. सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माच्या फलंदाजीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

“तुमच्या सोबतीला रोहित शर्मा असेल आणि तो फलंदाजीत चांगल्या फॉर्मात असेल तर धावांचा पाठलाग करताना काहीच समस्या येत नाही. कालचा विजय हा आमच्यासाठी सुखावणारा होता. विंडीजने मोठी धावसंख्या उभारली होती, त्यामुळे चांगली भागीदारी रचली तर हे आव्हान आम्ही पूर्ण करु शकतो याची आम्हाला खात्री होती. पहिल्या 3 फलंदाजांमध्ये मी प्रामु्ख्याने शेवटपर्यंत टिकून राहण्याची भूमिका स्विकारतो. रोहित आणि शिखर सुरुवातीला चांगली फटकेबाजी करतात यावर मला विश्वास आहे.” विराटने रोहितच्या फलंदाजीचं कौतुक केलं. शतकी खेळीसाठी कोहलीला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

अवश्य वाचा – Ind vs WI : पहिल्या वन-डे सामन्यात झालेले हे 13 विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?