प्ले ऑफच्या दुसऱ्या फेरीतील स्वीडनविरुद्ध अनिर्णीत राहिलेला सामना इटलीला चांगलाच महागात पडला आहे. या सामन्यानंतर इटलीच्या विश्वचषकातील आशा संपुष्टात आल्या असून, सामना बरोबरीत राखणाऱ्या स्वीडनने २०१८ च्या विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले. चारवेळा विश्वचॅम्पियन्स असणाऱ्या इटलीला हा मोठा धक्का आहे. मागील ६० वर्षात विश्वचषकासाठी अपात्र ठरण्याची नामुष्ठी संघावर ओढवली आहे. तर, दुसरीकडे स्वीडनचा संघ २००६ नंतर दुसऱ्यांदा वर्ल्डकपसाठी पात्र ठरला आहे.

२०१८ मध्ये रंगणाऱ्या विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी पात्रता फेरीतील इटलीसमोर स्वीडनचे आव्हान होते. यापूर्वी स्वीडनने इटलीला १-० असे पराभूत केले होते. पहिल्या फेरीत स्टॉकहोमच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात जॅकब योहानसनच्या गोलच्या जोरावर स्वीडनने इटलीला पराभूत केले होते. परिणामी दुसऱ्या सामन्यात स्वीडनला पराभूत करणे इटलीसाठी अनिवार्य झाले होते. मात्र, हा सामन्यात दोन्ही संघाकडून कोणताही गोल झाला नाही. सामना बरोबरीत सुटल्यानंतर स्वीडनने दुसऱ्यांदा विश्वचषकाचे तिकीट मिळवले तर बलाढ्य आणि दावेदार समजल्या जाणाऱ्या इटलीचा विश्वचषकासाठी अपात्र ठरले.  यापूर्वी १९५८ मध्ये इटलीला विश्वचषकात स्थान मिळवण्यात अपयश आले होते. तर १९३० रंगलेल्या पहिल्या विश्वचषखात इटलीने सहभाग घेतला नव्हता.