क्रिकेट ऑस्ट्रेलियाला नवी दिशा देण्यात मोलाचा वाटा उचलणारे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेम्स सदरलँड यांनी बुधवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मंडळाच्या प्रशासकीय निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र त्याच्या अशा तडकाफडकी राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात मंडळाची प्रतिमा डागाळली गेली असल्याने त्यांनी राजीनामा दिला असल्याचीही चर्चा रंगली आहे.

राजीनामा दिल्यानंतर मेलबर्न येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मात्र त्यांनी चेंडू कुरतडण्याच्या प्रकारामुळे हा निर्णय घेतला असल्याची शक्यता पूर्णपणे नाकारली. ते म्हणाले की मी एका अशा मंडळात काम करत होते, जेथे अनेक गोष्टी घडत असतात. त्यातील काही सुखद असतात, तर काही गोष्टी या केप टाऊनमधील प्रकरणासारख्या वाईटही असतात. पण म्हणून मी राजीनामा देतोय, असे नाही. जे प्रकरण घडले, ते निश्चितच गंभीर होते. मात्र आम्ही गेल्या वर्षभरात बऱ्याच गोष्टींचा सामना करत आहोत. त्यापैकी काही घटनांमुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत असून नव्या ‘सीईओ’ला संधी देऊ इच्छित आहे. नवे सीईओ खेळाडूंना आणि मंडळांना भक्कम उभारी देतील आणि नवी शिखरे पादाक्रांत करण्यास मोलाचा हातभार लावतील, असे सदरलँड म्हणाले.

२००१ साली माल्कम स्पीड यांच्या जागी सदरलँड यांची नियुक्ती करण्यात आली होती. सदरलँड म्हणाले की क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष डेव्हिड पीव्हर यांच्याशी मी दोन वर्षांपासून या संदर्भात चर्चा करत होतो. त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा निर्णय हा घाईघाईत आहे, असे मला वाटत नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या काही महत्वाच्या गोष्टींबाबत प्रशाकीय निर्णय घेतले जायचे होते. त्यामुळे मी अद्याप राजीनामा दिला नव्हता. मात्र आता हि पायउतार होण्याची योग्य वेळ आहे. नव्या लोकांना साधनही देण्याची ही चांगली संधी आहे.

सदरलँड यांनी गेली १७ वर्षे ही जबाबदारी सक्षमपणे पेलली. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर १९९८ साली त्यांचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संबंध आला आणि २००१ साली त्यांनी ‘सीईओ’पदाची धुरा हाती घेतली. पुढील वर्षभरात सदरलँड यांना सक्षम पर्याय उपलब्ध होईपर्यंत ते या पदावर कायम असणार आहेत.