अपंगांच्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या मानसी जोशीचा प्रेरणादायी प्रवास

ऋषिकेश बामणे, मुंबई</strong>

पी. व्ही. सिंधूने जगज्जेतेपद जिंकत बॅडमिंटनमध्ये सत्ता प्रस्थापित केली, याचप्रमाणे बॅडमिंटनपटू मानसी जोशीने अपंगांच्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेवर सुवर्णमोहर उमटवत सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या २२व्या वर्षी आलेले अपंगत्व आणि खेळण्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत यांसारख्या अनेक अडथळ्यांवर मात करून शीवच्या मानसीने स्वित्झर्लंडमध्ये भारताचा झेंडा डौलाने फडकावला आहे.

अंतिम फेरीत भारताच्याच पारुल परमारचा २१-१२, २१-७ पराभव करून मिळवलेल्या विजेतेपदानंतरच्या अनुभवाविषयी मानसी म्हणाली, ‘‘अपंग खेळाडूंच्या स्पर्धामध्ये फक्त आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद या स्पर्धामध्येच सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे राष्ट्रगीत वाजवले जाते. त्यामुळे ज्या वेळी भारताचे राष्ट्रगीत सुरू झाले, तेव्हा मला अश्रू अनावर झाले आणि मीसुद्धा मोठय़ाने राष्ट्रगीत गाऊ लागले. त्या दिवसापासून माझ्या आयुष्याने वेगळे वळण घेतले. दररोज मला अनेक कार्यक्रमांसाठी आमंत्रणे येत असून समाजमाध्यमांवरसुद्धा माझ्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव होत असल्याने मी या काळाचा फक्त आनंद लुटत आहे.’’

डिसेंबर २०११मध्ये चेंबूर येथील अणुशक्ती नगर येथून विक्रोळीच्या दिशेने प्रवास करताना मानसीचा अपघात झाला होता. यामध्ये तिला डावा पाय गमवावा लागला. परंतु मानसीने हार न मानता बॅडमिंटनचे वेड जपले. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळाविषयी विचारले असता मानसी म्हणाली, ‘‘माझ्या कुटुंबीयांसोबत फावल्या वेळेत बॅडमिंटन खेळतानाच मला या खेळाविषयी आवड निर्माण झाली. त्यामुळे माझे कुटुंबच माझे प्रेरणास्थान आहे. परंतु सुरुवातीला मला एका पायावर अतिरिक्त ताण जाणवू लागला. कित्येकदा मी खेळताना खालीसुद्धा कोसळली. मग हळूहळू सवय झाल्यावर २०१४ मध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्ये कृत्रिम पाय लावून खेळण्यास सुरुवात केली. पुढच्याच वर्षी मी पहिल्यांदाच भारताचे प्रतिनिधित्व केले. तेव्हापासून सुरू झालेला माझा प्रवास आता खऱ्या अर्थाने भरारी घेत आहे.’’

व्यावसायिक पातळीवर भारत पेट्रोलियमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मानसीच्या कारकीर्दीत विलास दामले आणि लिमये यांचे मोलाचे योगदान आहे. त्याशिवाय देवनार येथील रोटरी क्लब, भाभा अणू संशोधन केंद्रातील क्रीडा विभाग, ऑटोमिक एनर्जी सेंटर शाळा आणि के. जे. सोमय्या महाविद्यालय येथील अनेकांचे मला फार साहाय्य लाभले असल्याचेही मानसीने सांगितले. आतापर्यंत मानसीने विविध पातळीवरच्या स्पर्धामध्ये सात सुवर्ण, सात रौप्य आणि १२ कांस्यपदके मिळवली आहेत. सध्या मानसी पुढील वर्षी होणाऱ्या अपंग खेळाडूंच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करीत आहेत.