हैदराबाद येथे खेळवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशवर मात केल्यानंतर महाराष्ट्राचा उपांत्य फेरीत कर्नाटकविरुद्ध सामना होता. या लढतीत पहिल्या सत्रात महाराष्ट्राने २२-११ अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सत्रात बचावपटूंनी केलेल्या काही क्षुल्लक चुकांमुळे कर्नाटकच्या संघाने सामन्यात पुनरागमन करत अखेरच्या काही सेकंदांमध्ये ३४-३४ अशी बरोबरी साधली. अखेर निर्णायक चढाईत रिशांक देवाडीगाने महाराष्ट्राच्या विजयावर ३५-३४ असं शिक्कामोर्तब केलं.

उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशवर मात केल्यानंतर, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात होणारा उपांत्य फेरीचा सामना चुरशीचा होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र पहिल्या सत्रात कर्नाटकचा संग महाराष्ट्राच्या झंजावातापुढे टिकू शकला नाही. कर्णधार रिशांक देवाडीगा आणि निलेश साळुंखेच्या आक्रमक चढाया आणि बचावफळीत विराज लांडगेने केलेली चमकदार कामगिरी या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या सत्रात आपलं वर्चस्व कायम राखलं. गिरीश एर्नाकनेही पहिल्या सत्रात महाराष्ट्राच्या बचावफळीत चांगली कामगिरी बजावली.

महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तराखंडला उपांत्य सामन्यात पराभवाचं पाणी पाजणाऱ्या कर्नाटकच्या चढाईपटूंना महाराष्ट्राने चांगलच सतावलं. सुकेश हेडगे, प्रशांत कुमार राय यासारख्या खेळाडूंना सतत बाहेर बसवण्यात महाराष्ट्राचे खेळाडू यशस्वी ठरले. या जोरावर मध्यांतरापर्यंत महाराष्ट्राने सामन्यात २२-११ अशी दुप्पट आघाडी घेतली होती.

अवश्य वाचा – मुंबईत रंगणार महामुंबई कबड्डी लीगचा थरार!

मात्र दुसऱ्या सत्रात कर्नाटकच्या खेळाडूंनी सामन्यात अनपेक्षितपणे पुनरागमन केलं. कर्नाटकच्या प्रशिक्षकांनी प्रशांत कुमार रायला बदलून के. प्रपंजन या उंचपुऱ्या चढाईपटूला संघात स्थान दिलं. याचा परिणाम लगेचच मैदानात दिसून आला. प्रपंजनच्या चढाईमुळे महाराष्ट्राच्या बचावफळीत काहीशी चलबिचल झालेली पहायला मिळाली. ऋतुराज कोरवी आणि गिरीश ऐर्नाकला आपलं लक्ष्य करत प्रपंजनने सामन्याच चांगल्या गुणांची कमाई केली. या सत्रात प्रपंजनला शब्बीर बापूने चांगली साथ दिली. या खेळाच्या जोरावर ११ गुणांनी पिछाडीवर असलेला कर्नाटकचा संघ सामन्यात बरोबरीत आला.

दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राच्या बचावपटूंनी क्षुल्लक चुका करत कर्नाटकच्या संघाला गुण बहाल केले. सुकेश हेगडेच्या चढाईत विराज लांडगे आणि ऋतुराज कोरवीने केलेल्या चुकांमुळे अखेरच्या काही मिनीटात सामना चांगल्याच रंगतदार अवस्थेत पोहचला. मात्र ५० सेकंद शिल्लक असताना महाराष्ट्राच्या बचावपटूंनी प्रपंजनला आपल्या जाळ्यात अडकवत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर ३४-३४ असा सामना बरोबरीत आल्यानंतर रिशांक देवाडीगाच्या खांद्यावर अंतिम चढाईची वेळ आली. यावेळी रिशांकने कर्नाटकच्या उजव्या कोपऱ्यातील बचावपटूला बाद करत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.