इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० स्पध्रेचे यश आणि लोकप्रियतेच्या पावलावर पाऊल ठेवून दोन वर्षांपूर्वी भारतीय हौशी कबड्डी महासंघाने हैदराबादमध्ये पहिली कबड्डी प्रीमियर लीग (केपीएल) आयोजित केली होती, परंतु तिला अपेक्षित यश मिळाले नव्हते. परंतु येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यात सर्वाचे लक्ष वेधणारी ‘प्रो-कबड्डी’ स्पर्धा होणार आहे, अशी घोषणा ‘मशाल स्पोर्ट्स’तर्फे मुंबईतील एनएससीआय संकुलात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. ‘प्रो-कबड्डी’ स्पध्रेतील विजेत्याला किमान ५० लाख रुपयांचे इनाम मिळेल, असे संयोजकांनी सांगितले. ‘स्टार स्पोर्ट्स’ या क्रीडावाहिनीवरून या स्पध्रेचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने या स्पध्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
‘‘नवनीत गौतम, राकेश कुमार, अजय ठाकूर आणि राजगुरू यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कबड्डीपटूंचा खेळ ‘प्रो-कबड्डी’ या स्पध्रेत क्रीडारसिकांना अनुभवता येणार आहे. लवकरच या स्पध्रेसाठी खेळाडूंचा लिलाव होणार असून, प्रत्येकी १२ खेळाडूंचा समावेश असलेले आठ शहरांचे संघ या स्पध्रेत सहभागी असतील. या लिलावात १०० खेळाडूंचा समावेश असेल, त्यापैकी ७२ कबड्डीपटू भारतीय असतील; तथापि अन्य खेळाडू अफगाणिस्तान, बांगलादेश, कॅनडा, इंग्लंड, इंडोनेशिया, श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, अमेरिका आदी देशांचे असतील. प्रत्येक संघ अन्य संघाशी घरच्या मैदानावर आणि बाहेरच्या मैदानावर अशा प्रकारे दोनदा लढत देईल,’’ अशी माहिती ‘मशाल स्पोर्ट्स’चे व्यवस्थापकीय संचालक चारू शर्मा यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत आणि महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्राचे संचालक आनंद महिंद्रा यांच्या हस्ते या शानदार कार्यक्रमात ‘प्रो-कबड्डी’च्या लोगोचे आणि http://www.prokabaddi.com या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. या वेळी प्रो-कबड्डी आणि मशाल स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये एक प्रदर्शनीय सामनाही मॅटवर खेळवण्यात आला. या कार्यक्रमाला अर्जुन पुरस्कार विजेते सदानंद शेटय़े, अशोक शिंदे यांच्यासह अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटक उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकारवर गेहलोत यांची स्तुतिसुमने
‘‘केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या कारकिर्दीत कबड्डीचा आलेख उंचावला. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना भारतीय खेळाडूंनी जपानचा दौरा केला होता. त्यांनी तीन देशांचा सहभाग असलेली एक आंतरराष्ट्रीय स्पर्धासुद्धा आयोजित केली होती. १९८४मध्ये मी भारतीय हौशी कबड्डी महासंघाचा अध्यक्ष झालो. मग भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई इन्डोअर क्रीडा स्पर्धा आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेत सुवर्णयश मिळवले,’’ अशी माहिती आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारचे या वेळी कौतुक करताना गेहलोत म्हणाले की, ‘‘पाटणामध्ये झालेल्या महिलांच्या पहिल्या विश्वचषक कबड्डी स्पध्रेत भारताने सुवर्णपदक मिळवले. या संघातील महाराष्ट्राच्या तीन मुलींना महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस देऊन गौरवले. यानिमित्त मी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आभारी आहे.’’
‘‘क्रिकेटनंतर भारतात सर्वात जास्त प्रेक्षकसंख्या कबड्डीला लाभते,’’ असे गेहलोत यांनी आवर्जून सांगितले.