भारतीय कर्णधार विराट कोहलीचा शतकांचा दुष्काळ इंग्लंडविरोधातील मालिकेमध्येही संपला नाही. असं असतानाच आता भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी विराट कोहलीच्या बाजूने जबरदस्त शाब्दिक बॅटिंग करत त्याची पाठराखण केलीय. विराट कोहली भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडणार आहे असा विश्वास कपिल देव यांनी व्यक्त केलाय. विराटने आतापर्यंत एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये अनेक विक्रम केले आहेत पण तो कधीत स्वत:च्या वैयक्तिक विक्रमांसाठी खेळल्याचं दिसून आलं नाही. तो कर्णधार म्हणून जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तो चांगली धावसंख्या उभारण्यासाठी क्रिजवर असतो, असं विराटचे चाहते म्हणतात. याच पद्धतीचं वक्तव्य कपिल देव यांनी केलंय.

विराटची फलंदाजी सध्या भारतीय क्रिकेट चाहत्यांबरोबर जगभरातील क्रिडाप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी याच चर्चांवर भाष्य करताना विराटची पाठराखण केलीय. कपिल देव यांनी विराट पूर्वीप्रमाणे पुन्हा फॉर्ममध्ये आला, त्याला लय गवसल्यानंतर तो शानदार शतकं साजरी करेल असा विश्वास व्यक्त केलाय. अनकट नावाच्या एक शोमध्ये बोलताना कपिल देव यांनी कोहलीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर आठवण करुन दिली की विराट हा कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक शतकं ठोकणारा खेळाडू आहे. सामना जिंकवण्यासाठी कोणत्याही भारतीय कर्णधाराने केलेल्या शतकांमध्ये सर्वाधिक शतके विराटची असल्याचंही कपिल देव म्हणालेत. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करु लागल्यापासून विराटची फलंदाजीमधील लय थोडी बिघडल्यासारखी वाटत आहे.

“एवढ्या वर्ष तो धावांचा डोंगर उभारत होता तेव्हा त्याची फलंदाजी किंवा त्याच्या कर्णधारपदाचा फलंदाजीवर परिणाम होतोय याबद्दल कोणी काही बोललं नव्हतं. अचानक त्याच्या कामगिरीचा आलेख थोडा खाली गेला तर त्याच्यावर टीका होऊ लागलीय. आतापर्यंत त्याने जेवढी शतकं केली आहे त्या सामन्यांमध्ये त्याच्यावर दबाव नव्हता का? त्याच्याकडे कर्णधारपद आल्याने हे झालेले नाहीय. आपण त्याच्या क्षमतेवर शंका घेता कामा नये,” असं मत कपिल देव यांनी व्यक्त केलंय.

विराट कोहली हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. कोहलीने आपलं शेवटचं आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये साजरं केलं होतं. कोहलीने आतापर्यंत ९६ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २७ शतकं केली आहेत. तर एक दिवसीय सामन्यांमध्ये कोहलीच्या नावे ४३ शतकं आहेत. कोहलीसाठी इंग्लंड दौरा फार महत्वाचा होता. त्याने कर्णधार म्हणून ऐतिहासिक कामगिरी केली असली तरी त्याला वैयक्तिक पातळीवर तिहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

कोहलीच्या या फॉर्मबद्दल बोलताना कपिल देव यांनी, “त्याच्या कामगिरीचा आलेख थोडा कमी जास्त झालाय पण हे कधीपर्यंत राहणार आहे?, २८ ते ३२ वयोगट हा तो कालावधी आहे जेव्हा तुम्ही एक खेळाडू म्हणून फार विचार करुन खेळता. तो (विराट) आता एक अनुभवी खेळाडू आहे. जर तो त्याच्या आधीच्या फॉर्ममध्ये परतला तर शतक आणि दुहेरी शतक नाही तर तो ३०० धावा सुद्धा आपल्याला करुन दाखवेल. आता तो फार समजदार खेळाडू आहे. फिटनेसबद्दलही तो फारच काळजी घेणार आणि इतरांपेक्षा कुठेही, थोडीही कमतरता नसणारा खेळाडू आहे. त्याला आता मोठ्या खेळी खेळण्याची आवश्यकता आहे,” असं म्हटलंय.