महाराष्ट्राच्या करिश्मा वाडकर हिने सुशांत चिपलकट्टी स्मृती चषक आंतरराष्ट्रीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतील मुलींच्या गटात आगेकूच राखली. कनिष्ठ गटाच्या या स्पर्धेत सहाव्या मानांकित रेवती देवस्थळी या स्थानिक खेळाडूला पराभवाचा धक्का बसला.
लक्ष्मी क्रीडा मंदिर बॅडमिंटन क्लबने मॉडर्न क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनीच वर्चस्व गाजविले. सातव्या मानांकित करिश्माने ममीथा काद्री हिला २१-६, २१-१४ असे हरविले. तिने परतीच्या सुरेख फटक्यांबरोबरच नेटजवळून प्लेसिंगचा बहारदार खेळ केला. जी.वृषाली हिने देवस्थळी हिचा २१-११, २१-१५ असा पराभव केला. तिने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा उपयोग करीत हा सामना जिंकला. देवस्थळी हिला अपेक्षेइतका प्रभाव दाखविता आला नाही. अग्रमानांकित जी.ऋत्विका शिवानी हिने रेश्मा कार्तिक हिला २१-१८, २१-८ असे पराभूत केले. पहिल्या गेममध्ये रेश्माने चिवट झुंज दिली मात्र दुसऱ्या गेममध्ये शिवानी हिने खेळावर नियंत्रण ठेवीत रेश्माला फारशी संधी दिली नाही. सिंगापूरच्या लियांग झिओयु हिने अरुणा प्रभुदेसाई हिचे आव्हान २१-१२, २१-९ असे संपुष्टात आणले.
या स्पर्धेचे उद्घाटन चितळे बंधु मिठाईवालेचे भागीदार केदार चितळे यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेतील अन्य निकाल-मुली एकेरी-सारा नक्वी वि.वि. गौरी असिजा २१-८, २१-१४. रितुपर्णा दास वि.वि. वैष्णवी अय्यर २१-१२, २१-६.
मिश्रदुहेरी-चिराग सेन व कुहु गर्ग वि.वि. आदर्श बिन्नी व सृष्टी कोरमपथ २१-१४, १५-२१, २४-२२. सौरभ शर्मा व के.मनीषा वि.वि. नरेंद्र गौराम व ममीथा काद्री २१-१९, २१-६. के.पी.चैतन्य व सुधा कल्याणी वि.वि. दीपेश धामी व श्रेष्ठा सिचिया २१-७, २१-१५. सुरेश बिच्चू व फरहा माथूर वि.वि. आदित्य कुकरेजा व पलक कुकरेजा २१-१२, २१-९. विनयसिंग व प्रज्ञा राय वि.वि. कौस्तुभ डेका व निंगशी हजारिका २१-१५, २१-१६.
रेवती देवस्थळीला पराभवाचा धक्का