ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ९ बाद २५० धावा केल्या. चेतेश्वर पुजाराच्या संयमी १२३ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने अडीचशे धावांपर्यंत मजल मारली. सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांची दैना उडाली. लोकेश राहुल आणि मुरली विजय हे सलामीवीर अनुक्रमे २ आणि ११ धावांवर बाद झाले. त्यानंतर भारताचा कर्णधार आणि भरवशाचा फलंदाज विराट कोहली देखील स्वस्तात बाद झाला.

विराट कोहलीने केवळ ३ धावा केल्या आणि बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅट लावून तो स्लिपमध्ये झेलबाद झाला. अॅडलेडच्या मैदानावर विराट कोहलीने केलेली ही सर्वात कमी धावसंख्या ठरली तसेच अॅडलेडच्या मैदानावर तो प्रथमच एक अंकी धावसंख्येवर बाद झाला.

आजपर्यंत कोहलीने अनेक विस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. अॅडलेडच्या मैदानावर गेल्या ८ डावांमध्ये त्याने ४ शतके झळकावली, तर एक नाबाद ९० धावांची खेळी केली. या खेळीत त्याचा पहिलेवहिले शतक, कर्णधार म्हणून पदार्पण केल्यावर झळकावलेली दोन शतके आणि पाकिस्तानविरुद्ध ठोकलेले शतक समाविष्ट आहे. तसेच त्याची सर्वोत्तम टी२० खेळीदेखील याच मैदानावरील आहे. पण आजच्या सामन्यात त्याच्यावर अॅडलेडचे मैदान रुसलेले दिसून आले.