वयाच्या ४६व्या वर्षीही एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल, अशी कामगिरी करणाऱ्या भारताच्या अनुभवी लिएण्डर पेसने पुरुष दुहेरीतील सहकारी मार्कस डॅनिएलसह शनिवारी एटीपी हॉल ऑफ फेम खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

उपांत्यपूर्व सामन्यात पेस-डॅनिएल यांच्या तिसऱ्या मानांकित जोडीने मॅथ्यू एब्डन आणि रॉबर्ट लिंडेस्टेड यांचा ६-४, ५-७, १४-१२ असा संघर्षमय लढतीत पराभव केला. पेस-डॅनिएल यांनी तीन मॅच-पॉइंट वाचवून हा सामना जिंकला. १९९५ मध्ये कारकीर्दीतील पहिली हॉल ऑफ फेम स्पर्धा खेळणारा पेस वयाच्या ४६व्या वर्षी या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी जॉन मॅकएन्रो यांनी वयाच्या ४७व्या वर्षी २००६ मध्ये हॉल ऑफ फेमच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते.

‘‘कारकीर्दीत मी अनेक कठीण प्रसंगांवर मात केली. कधी-कधी ताप असताना खेळलो आहे, तर इच्छा नसतानाही जिममध्ये मेहनत घेतली आहे; परंतु टेनिसच्या प्रेमापोटीच आजपर्यंत स्पर्धेत टिकू शकलो,’’ अशी प्रतिक्रिया पेसने विजयानंतर व्यक्त केली. उपांत्य सामन्यात पेस-डॅनिएलपुढे मार्सेल ग्रॅनोलर्स आणि सर्गी स्टॅखोव्हस्कीचे आव्हान असणार आहे.