मुंबई उपनगरात ९ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत रंगणाऱ्या फेडरेशन चषक कबड्डी स्पध्रेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ संभाव्य स्वरूपात जाहीर करण्यात आले असून, तब्बल ११ वर्षांनी राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या पुरुष संघात चार बदल करण्यात आले आहेत. सध्या हा संघ संभाव्य स्वरुपात जाहीर करण्यात आलेला असला तरीही यामध्ये बदल होण्याची शक्यता कमी असल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. याचप्रमाणे महाराष्ट्राच्या महिला संघात तीन बदल करण्यात आले असून, हैदराबादला झालेल्या राष्ट्रीय स्पध्रेप्रसंगी अन्याय झालेल्या पुण्याच्या आम्रपाली गलांडेला संघात स्थान देण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने राष्ट्रीय विजेतेपद मिळवले असले तरी सचिन शिंगार्डे (सांगली), अजिंक्य कापरे (मुंबई), रवी ढगे (जालना), सिद्धार्थ देसाई (पुणे) या चौघांना संघातून वगळण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यांच्या जागी विशाल माने, युवराज जाधव, कृष्णा मदने, उमेश म्हात्रे यांनी संघात स्थान मिळवले आहे.

महिला संघातून पुण्याच्या स्नेहल शिंदेला आश्चर्यकारकरीत्या वगळण्यात आले आहे. याशिवाय पूजा पाटील (पालघर) आणि पूजा पाटील (कोल्हापूर) या दोघींनाही डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या जागी पुण्याची किशोरी शिंदे आणि आम्रपाली गलांडे यांना संघात स्थान दिले आहे. तसेच रत्नागिरीच्या श्रद्धा पवारवर विश्वास दाखवण्यात आला आहे. महिलांच्या प्रशिक्षकपदी राजेश ढमढेरे यांच्या जागी सुहास जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

फेडरेशन चषकासाठी महाराष्ट्राचे संघ –

पुरुष : कर्णधार रिशांक देवाडिगा (उपनगर), विकास काळे, विराज लांडगे, युवराज जाधव (पुणे), नितीन मदने, कृष्णा मदने (सांगली), गिरीश इर्नाक, नीलेश साळुंखे, उमेश म्हात्रे (ठाणे), तुषार पाटील, ऋतुराज कोरवी (कोल्हापूर), विशाल माने (मुंबई); प्रशिक्षक – माणिक राठोड, व्यवस्थापक – फिरोझ पठाण.

महिला : कर्णधार सायली जाधव, अभिलाषा म्हात्रे, कोमल देवकर, तेजस्वी पाटेकर (उपनगर), किशोरी शिंदे, सायली केरिपाळे, पूजा शेलार, आम्रपाली गलांडे (पुणे), ललिता घरत, श्रद्धा पवार (रत्नागिरी), सुवर्णा बारटक्के (मुंबई), चैताली बोराडे (ठाणे); प्रशिक्षक – सुहास जोशी, व्यवस्थापक – हिमाली ढोलम.