सुरत येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय कुमार व मुली (१८ वर्षांखालील) अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत महाराष्ट्रासह कोल्हापूरच्या दोन्ही संघानी अंतिम फेरी प्रवेश केला.

महाराष्ट्राच्या कुमारांनी उपांत्य फेरीत छत्तीसगढ संघाचा १८-६ असा १२ गुण व डावाच्या फरकाने धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या झंझावाती खेळासमोर सपशेल माघार घेत छत्तीसगढने मध्यंतरालाच सामना सोडला. महाराष्ट्राच्या संकेत कदम ने २ मि संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले, तर तेजस मगर व ऋषिकेश मुर्चावडे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोल्हापूरने गोव्यावर २६-११ अशी १५ गुण व ५.४० मिनीटे राखून मात केली. विजयी संघाच्या अक्षय सुतारने २ मिनिटे छान हुलकावण्या देत आक्रमणात ३ गडी टिपले, तर अवधूत पाटीलने  ४ गुणांची कमाई केली.

मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी विदर्भचे आव्हान १८-६ असे १ डाव व १२ गुणांनी परतावून लावत दिमाखात अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या तन्वी कांबळे ने  ३.१० मिनिटे, रूपाली बडे व हेमलता गायकवाड यांनी प्रत्येकी २.४० मिनिटे संरक्षण केले, तर आक्रमणात प्रियांका भोपीने ६ व दीक्षा कदम व ऋतुजा बडेने प्रत्येकी ३ गुण नोंदवले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोल्हापूरने यजमान गुजरात संघावर ७-६ असा १ डाव व एका गुणाने पराभव केला. कोल्हापूरकडून पल्लवी मराडी  , अमृता कोकिटकर  व ऋतुजा खाडे   चमकल्या.