घाटकोपर असल्फा येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सुरू असलेल्या प्रमोद महाजन स्मृती चषक स्पध्रेत महिलांमध्ये आता महात्मा फुले वि. महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब असा अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. घाटकोपरच्या महात्मा फुले स्पोर्ट्स क्लबने चेंबूर क्रीडा केंद्राचा २६-२० असा पराभव केला. याचप्रमाणे प्रथम श्रेणी पुरुष गटातील अंतिम फेरीत भांडुपच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाला सत्यम सेवा संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. उत्कर्षने चेंबूरचे आव्हान लीलया पेलले.

महिलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात निकिता उत्तेकर आणि प्रगती कणसे यांनी अव्वल खेळाचे प्रदर्शन करत घाटकोपरच्या महात्मा फुले संघाला मध्यंतराला १२-१० असे आघाडीवर आणले होते. मध्यंतरानंतर चेंबूर क्रीडा केंद्राच्या पायल पवार आणि पल्लवी बोटे यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला. पण निकिता आणि प्रगतीला मयूरी मोहितेची पकडीमध्ये साथ न लाभल्यामुळे गुणसंख्येशी बरोबरी साधण्याचे चेंबूर क्रीडा केंद्राचे प्रयत्न व्यर्थ ठरले. दुसऱ्या सामन्यात महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबने भांडुपच्या संजीवनी क्रीडा मंडळाचा ५५-१२ असा धुव्वा उडवला. प्रतीक्षा मांडवकरच्या चढाया आणि मीनल जाधव हिच्या पकडींपुढे संजीवनी क्रीडा मंडळाची मात्रा चाललीच नाही. महात्मा गांधी संघाने सुरुवातीलाच २३-५ अशी मोठी आघाडी घेतली होती. प्रतीक्षाच्या खोलवर चढायांमुळे महात्मा गांधीने मध्यंतरानंतरही ३२ गुणांची भर घातली. पराभूत संघाकडून चिरल कासार आणि मनाली निक्ते यांनी लढत दिली.

पुरुषांच्या उपांत्य सामन्यत उत्कर्ष क्रीडा मंडळाने चेंबूर क्रीडा केंद्रावर ३८-१८ असा सहज विजय मिळवला. पुरुषोत्तम प्रभूच्या चढाया आणि नितीन घोगलेच्या पकडींमुळे उत्कर्षने मध्यंतराला १७-७ गुणांची आघाडी मिळवली होती. मध्यंतरानंतर त्या आघाडीत दुपटीने भर घालत उत्कर्ष क्रीडा मंडळाने २० गुणांच्या फरकाने विजय मिळवला. सागर नार्वेकर आणि आकाश कदम यांचे प्रयत्न चेंबूरला विजय मिळवून देण्यात अपुरे पडले.

द्वितीय श्रेणी पुरुष गटाचा अंतिम सामना शिवशंकर निसरड प्रतिष्ठान (घाटकोपर) आणि श्रीकृष्ण क्रीडा मंडळ यांच्यात होईल. उपांत्य फेरीत शिवशंकर संघाने भांडुपच्या साईश्रद्धा क्रीडा मंडळाचा २९-२० असा पराभव केला. राजेश राणेच्या चढाया आणि नागेश घरतच्या पकडींमुळे साईश्रद्धा मंडळाने पहिल्या सत्रात १२-१० अशी आघाडी घेतली होती. पण भरत निसरड आणि प्रशांत निसरड यांनी मध्यंतरानंतर टाकलेल्या सुरेख चढाया आणि आशीष धोंडे व अंकित घाग यांनी केलेल्या सुरेख पकडी यामुळे शिवशंकर निसरड प्रतिष्ठानने विजय मिळवत अंतिम फेरीत आगेकूच केली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सुनील सहानीने एका चढाईत चार गडी बाद करत श्रीकृष्ण क्रीडा मंडळाला घाटकोपरच्या श्री सिद्धेश्वर गणेश मंदिर संघावर २०-८ असा विजय मिळवून दिला. सुनील सहानीला चढाईत प्रमोद गावडे आणि पकडीत विशाल पाटीलने चांगली साथ दिली.