भारत ‘अ’ आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज सामना; युवराजवर साऱ्यांचे लक्ष

भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला कर्णधारपद भूषवताना पाहण्याची शेवटची संधी इंग्लंडविरुद्धच्या भारत ‘अ’ संघाच्या सराव सामन्याद्वारे ब्रेबॉर्न स्टेडियमवर चाहत्यांना मिळणार आहे. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन केलेला युवराज सिंग या सामन्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. रणजी हंगामात धावांची टांकसाळ उघडत युवराजने निवड समितीला दखल घेण्यास भाग पाडले. त्याचबरोबर अनुभवी मध्यमगती गोलंदाज आशीष नेहरासाठी हा सामना म्हणजे तंदुरुस्तीची चाचणीच असेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी सराव सामने ही युवराजसाठी उत्तम संधी आहे. मात्र कडेकोट पोलीस बंदोबस्ताच्या कारणास्तव मोजक्याच चाहत्यांना सामना पाहण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय कर्णधार म्हणून बरेच विक्रम नावावर असणाऱ्या धोनीसाठी कर्णधार म्हणून हा शेवटचा सामना असेल. गेल्याच आठवडय़ात धोनीने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत सर्वाना चकित केले होते. कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त होत असला तरी संघातून खेळणार असल्याने फलंदाज धोनीला स्वत:ला मोठी खेळी करण्याची संधी मिळू शकते. लागोपाठच्या कसोटी मालिकांमुळे धोनी प्रदीर्घ काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. सराव सामन्यांद्वारे त्याला फलंदाजीची अस्त्रे परजून घेण्याची सुवर्णसंधी आहे.

३५ वर्षीय युवराज गेल्या वर्षी मार्च महिन्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. २०१३ नंतर युवराज एकदिवसीय सामना खेळलेला नाही. या पाश्र्वभूमीवर युवराजसाठी सराव सामना महत्त्वपूर्ण आहे. धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनही संघात परतला आहे. रणजी स्पर्धेत शिखरला दमदार कामगिरी करता आलेली नाही, मात्र तरीही त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी सज्ज होण्यासाठी शिखर आतुर आहे. आयपीएलदरम्यान दुखापतग्रस्त झालेला ३७ वर्षीय नेहरा शस्त्रक्रियेनंतर परतला असून, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे.

कसोटी संघाचा भाग असलेला, मात्र दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेला हार्दिक पंडय़ाचेही पुनरागमन झाले आहे. अंतिम संघात स्थान मिळावे यासाठी दावा पक्का करण्यासाठी हार्दिक प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने सराव सामने त्याच्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. सर्वसाधारण प्रदर्शनामुळे संघाबाहेर गेलेले अंबाती रायुडू आणि मोहित शर्मा निवड समितीसमोर पर्याय सादर करण्यासाठी उत्सुक आहेत.

कसोटी मालिकेत चीतपट झाल्यानंतर इंग्लंडचा संघ एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२०  मालिकेसाठी तयार आहे. कर्णधारपद अ‍ॅलिस्टर कुककडून इऑन मॉर्गनकडे आले आहे. मॉर्गन, अ‍ॅलेक्स हेल्स, जेसन रॉय आणि डेव्हिड विली ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश स्पर्धेत चांगली कामगिरी करून भारतात दाखल झाले आहेत. कौटुंबिक कारणास्तव जो रूट भारतात उशिरा दाखल होणार आहे. त्यामुळे पहिल्या सराव लढतीसाठी तो उपलब्ध असणार नाही.

प्रतिस्पर्धी संघ

  • भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मनदीप सिंग, शिखर धवन, अंबाती रायुडू, युवराज सिंग, हार्दिक पंडय़ा, संजू सॅमसन, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, आशीष नेहरा, मोहित शर्मा, सिद्धार्थ कौल.
  • इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जेक बॉल, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, लिआम डॉसन, अ‍ॅलेक्स हेल्स, लायम प्लंकेट, आदील रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली आणि ख्रिस वोक्स.
  • वेळ : दुपारी १.३० वाजता.