करोना विषाणूचे भय किती काळ बाळगणार, असा सवाल पुढील आठवडय़ात पहिल्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी सज्ज होणाऱ्या मेरी कोमने केला आहे.

सहा वेळा विश्वविजेत्या ३७ वर्षीय मेरीने गतवर्षी घरीच सराव केला. त्यानंतर डेंग्यूमुळे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रतेचा दर्जा लाभलेल्या जॉर्डन येथील आशियाई स्पर्धेला तिला मुकावे लागले. परंतु आजारपणातून सावरल्यावर जानेवारीत मेरी बेंगळूरुच्या राष्ट्रीय अकादमीत सामील झाली असून १ ते ७ मार्च या कालावधीत कॅसलॉन (स्पेन) येथे होणाऱ्या बॉक्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती सहभागी होणार आहे.

‘‘मला प्रवासाची भीती वाटत होती. मी आताही अतिशय सावध आहे, परंतु हे भय किती काळ बाळगणार? हे चक्र कुठे तरी थांबायला हवे. करोनाच संसर्ग टाळण्यासाठी समजूतदारपणाची आवश्यकता आहे. मुखपट्टी आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या साधनांसह मी स्वत:ची काळजी घेते. पण तरीही मनावरील भीती कायम असते,’’ अशी चिंता मेरीने प्रकट केली.

‘‘आता माझे शरीर मला उत्तम साथ देत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या डेंग्यूमुळे माझे बरेच नुकसान झाले. माझे वजनही कमालीचे वाढून ५७ ते ५९ किलोपर्यंत गेले. परंतु बेंगळूरुमधील विशेष सरावामुळे आता माझे वजन ५१-५२ पर्यंत कमी झाले आहे,’’ असे मेरीने सांगितले.

मेरी ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) कृती दलातील खेळाडू सदिच्छादूत आहे. ‘आयओसी’ने नुकतीच जागतिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धा रद्द केली. याबाबत मेरी म्हणाली, ‘‘परिस्थिती पूर्वपदावर यावी, असे सर्वाना वाटते आहे. परंतु याच वेळी काही आव्हानेसुद्धा समोर आहेत म्हणूनच काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे माझ्या विरोधाने कोणताच फरक पडत नाही. जेव्हा स्पर्धा होत होत्या, त्या वेळी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्यांना मी नशीबवान म्हणेन.’’

निकाल माझ्या हातात नाही!

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मी सर्वोत्तम कामगिरी बजावेन, परंतु निकाल माझ्या हातात नाही, असे स्पष्टीकरण मेरीने दिले. जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील अपेक्षांबाबत मेरी म्हणाली, ‘‘मी बेंगळूरुच्या शिबिरात जेव्हा दाखल झाले, तेव्हा मीच सर्वात वेगवान होते. परंतु टोक्यो ऑलिम्पिकचे आव्हान सोपे नसेल, याची मला जाणीव आहे. परंतु सध्या तरी या स्पर्धेकडे मी संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.’’