ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर एम.सी.मेरी कोम हिने भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निरीक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. कोणत्याही सक्रिय खेळाडू राष्ट्रीय स्तरावर निरीक्षक म्हणून कार्यरत राहता येणार नाही, असे क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर मेरी कोमने पदाचा राजीनामा दिला.

राजीनामा दिल्यानंतर मेरी कोम म्हणाली की, क्रीडामंत्र्यांशी चर्चा करुन राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मी या पदाची मागणी केली नव्हती, पद भूषवण्याची विनंती केल्यानंतर ही जबाबदारी स्वीकारली. ही जबाबदारी देण्यात आली त्यावेळी तत्कालीन क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास यांना सक्रिय खेळाडूला निरीक्षक पद भुषवण्यासंदर्भातील नियमावली संदर्भात विचारणा केली होती. मंत्रालयाच्या विनंतीनंतर हे पद स्वीकारले. मला कोणत्याही वादात पडायचे नाही. त्यामुळे पदाचा राजीनामा दिला.

तत्कालीन क्रीडामंत्री विजय गोयल यांनी मार्चमध्ये १२ खेळाडूंची राष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, सुशील कुमार, आणि बॉक्सर अखिर कुमार यांच्यासह मेरी कोमचा समावेश होता. सुशील आणि मेरी कोम सक्रीय खेळाडू आहेत. नुकतेच आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत पाचव्यांदा सुवर्ण पटकावून मेरी कोमने बॉक्सिंगच्या रिंगमध्ये नवा इतिहास रचला होता. या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदक मिळवण्याचा पराक्रम तिने केला. या स्पर्धेतील यशानंतर तिने कारकिर्दीतील प्रत्येक पदक खास असल्याची प्रतिक्रिया दिली होती.