नॉटिंगहॅम :  गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून गुरुवारी ट्रेंट ब्रिज येथे ४८ धावांनी पराभव पत्करल्यानंतरही बांगलादेशचा संघ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठू शकतो, असा आशावाद कर्णधार मशरफ मोर्तझाने व्यक्त केला आहे.

‘‘अजूनही आमचे तीन सामने बाकी आहेत. त्यात आम्ही अजून चांगली कामगिरी करून दाखवू. हे तिन्ही सामने जिंकलो तरी उपांत्य फेरी गाठणे आमच्यासाठी आव्हानात्मक असेल, याची आम्हाला कल्पना आहे,’’ असे मोर्तझाने सांगितले. बांगलादेशचा पुढील सामना २४ जूनला साऊदम्पटन येथे अफगाणिस्तानशी होणार आहे.

१० संघांचा समावेश असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत राऊंड रॉबिन पद्धतीने सामने होत असून, यापैकी चार अव्वल संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करला असला तरी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघाचा पराभव करून बांगलादेशने गुणतालिकेत पाचवे स्थान प्राप्त केले आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या भारतापसून ते केवळ दोन गुणांनी मागे आहेत.

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लड आणि भारत हे संघ अव्वल चार स्थानांवर असून अजूनही काही सामने बाकी आहेत. त्यामुळे स्पर्धेत आणखी रंगत निर्माण होऊ शकते, असे मोर्तझाने सांगितले.