मुंबई : भारताचा उदयोन्मुख क्रिकेटपटू पृथ्वी शॉ, एकनाथ केरकर आणि मुंबई संघाचे प्रशिक्षक विनायक सामंत यांना बेशिस्त वर्तनामुळे मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) शिस्तपालन समितीकडून ताकीद देण्यात आली आहे.

२० वर्षीय पृथ्वी यापूर्वीही उत्तेजकांचे सेवन केल्यामुळे आठ महिन्यांच्या शिक्षेला सामोरा गेला आहे. बडोद्याविरुद्ध झालेल्या मुंबईच्या पहिल्या सामन्यात पृथ्वी आणि एकनाथ यांनी खेळाडूंचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यामुळेच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सदर प्रकरणाविषयी ‘एमसीए’कडे तक्रार केली. मात्र पृथ्वी आणि एकनाथ या दोघांचीही रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईच्या संघात निवड करण्यात आली आहे.

त्याशिवाय सामंत यांच्याविरुद्ध काही खेळाडूंनी आवाज उठवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बडोद्याविरुद्धच्या सामन्यादरम्यान सामंत यांची वर्तणूक योग्य नसल्याचे काही खेळाडूंनी म्हटले आहे. त्यामुळे शिस्तपालन समितीने या तिघांनाही ताकीद देऊन तूर्तास प्रकरण मिटवले आहे.

सिद्धेशचे मुंबईच्या संघात पुनरागमन

मुंबई : ‘संकटमोचक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धेश लाडचे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईच्या संघात पुनरागमन झाले आहे. त्याशिवाय अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ यांनाही मुंबईच्या अंतिम १५ खेळाडूंच्या चमूत कायम राखण्यात आले आहे.

४१ वेळा रणजी करंडकावर नाव कोरणाऱ्या मुंबईने पहिल्या सामन्यात बडोद्याला सहज पराभूत केले होते. रेल्वेविरुद्ध मुंबईची लढत २५ डिसेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे होणार आहे.

बडोद्याविरुद्धच्या लढतीला सिद्धेशला विवाहामुळे मुकावे लागले होते. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने सिद्धेशव्यतिरिक्त पहिल्या लढतीतील संघच कायम ठेवला आहे.