कर्णधार अजिंक्य रहाणेकडून विश्लेषण
मेलबर्न : अॅडलेडला फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताने मानहानीकारक पराभव पत्करला. परंतु मेलबर्नच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध साकारलेले दिमाखदार शतक हे धावांचा दुष्काळ संपवणारे ठरले. मेलबर्नच्या शतकाने मालिकाविजयाची पायाभरणी केल्याचे रहाणेने सांगितले.
मेलबर्नला ११२ धावांची खेळी साकारली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २-१ अशा मालिकाविजयाबाबत रहाणे म्हणाला, ‘‘माझ्या धावांमुळे जेव्हा संघ जिंकतो, तेव्हा त्या माझ्यासाठी खूप खास असतात. माझ्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा कसोटी सामना आणि मालिका जिंकणे, हे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे असते.’’
रहाणेचे लॉर्ड्सवरील शतक आणि मेलबर्नवरील शतकाची चाहते तुलना करू लागले आहेत, याबाबत रहाणे म्हणाला, ‘‘शतकांची तुलना कशी करावी, हेच मला कळत नाही. परंतु आता मला त्याचे महत्त्व कळू लागले आहे. अॅडलेडच्या दारुण पराभवानंतरच्या स्थितीत मेलबर्नचे शतक हे मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचेच होते. त्यामुळेच मेलबर्नचे शतक अतिशय खास ठरते.’’
अॅडलेट कसोटीनंतर कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतला, मोहम्मद शमी जायबंदी झाला. तरीही रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने विजयाध्याय लिहिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 25, 2021 12:42 am