पुस्तकांमध्ये वादग्रस्त विधाने करीत प्रसिद्धी मिळवण्याचे तंत्र काही जणांनी यशस्वीरीत्या दाखवून दिले. पण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने मात्र ‘अ‍ॅशेस डायरी २०१५’ या पुस्तकामध्ये संघसहकारी आणि माजी प्रशिक्षक जॉन बकनन यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मॅथ्यू हेडन आणि अँड्रय़ू सायमंड्स यांनी जाहीररीत्या क्लार्कवर टीका केली होती. या टीकेचा खरपूस समाचार क्लार्कने या पुस्तकामध्ये घेतला आहे.
‘त्यांनी तर देशाचेही प्रतिनिधित्व केले नाही’ असा चिमटा क्लार्कने बकनन यांना काढला आहे. त्यापुढे जाऊन क्लार्कने बकनन यांची तुलना त्याच्या पाळीव कुत्र्याबरोबर केली आहे. बकनन यांचे यश माझा लाडका कुत्रा ‘जेरी’सारखेच आहे, असे क्लार्कने म्हटले आहे.
सायमंड्सच्या टीकेला उत्तर देताना क्लार्क म्हणाला की, ‘‘सायमंड्सने दूरचित्रवाणीवर माझ्या नेतृत्वावर टीका केली होती. मला माफ करा, पण माझ्या नेतृत्वावर भाष्य करण्याचा अधिकार त्याला नाही. देशाचे प्रतिनिधित्व करताना जो मद्यपान करून यायचा, त्याला टीका करण्याचा काय अधिकार आहे?’’
कारकीर्दीच्या सुरुवातीला सायमंड्स आणि क्लार्क हे चांगले मित्र होते. पण कारकीर्दीमध्ये बेशिस्त वर्तणुकीचा सायमंड्सला फटका बसला. २००९ साली इंग्लंडमध्ये मद्यपान केल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सायमंड्सवर बंदी घालत त्याचा करार रद्द केला होता. दुसरीकडे क्लार्कला फारच कमी वयामध्ये ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद करण्याची संधी मिळाली. त्यानंतर या दोघांमध्ये विस्तवही जात नव्हता.
कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात क्लार्कने फलंदाजाजवळ क्षेत्ररक्षण करण्यास नकार दिला होता, अशी टीका हेडनने क्लार्कवर केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना क्लार्क म्हणाला की, ‘‘ऑस्ट्रेलियाकडून खेळताना मला भरपूर आनंद मिळाला. पॉन्टिंगने मला काहीही सांगितले तर ते मी नक्कीच करीन.’’