क्रिकेटच्या मैदानात अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या गेलेल्या माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ सोशल मीडियावर सक्रिय आहे. ट्विटरच्या माध्यमातून कैफने नुकतेच एका बेपत्ता मुलाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. कैफने सोशल मीडियाचा वापर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो याचे उदाहरण दिले. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एका मुलाचे छायाचित्र ट्विट केले असून संबंधित मुलगा बेपत्ता असल्याची माहिती दिली आहे. कैफने ट्विट केलेल्या माहितीनुसार १३ वर्षीय दक्षेश अरोरा नावाचा मुलगा दिल्लीच्या टिळक नगर परिसरातून बेपत्ता झाला आहे. या मुलाच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास ९९५३०६५३६७, ९८९१४६५०१० आणि ९८९९९८८६४८ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

वाचा: मोहम्मद कैफचा सूर्यनमस्कार कट्टरपंथियांना खटकला; ट्विटरवर उमटल्या प्रतिक्रिया

नुकतेच मोहम्मद कैफने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सूर्य नमस्कार करतानाचे छायाचित्र ट्विट केले होते. मोहम्मद कैफने आरोग्याविषयक सल्ले देताना सूर्य नमस्कार घालणे हा सर्वोत्तम व्यायाम असल्याचे म्हटले होते. उत्तम आरोग्यासाठी हा सल्ला देत असताना कैफने सूर्य नमस्कार करतानाचे काही फोटो ट्विटरवरुन शेअर केले होते. कैफचा फोटोतील अंदाज काही मुस्लीम कट्टर पंथियांना अजिबात रुचला नव्हता. त्यामुळे काही कट्टरपंथियांनी कैफवर निशाणा साधला. मुस्लीम असून सूर्यनमस्कार करणे इस्लामविरोधात असल्याचे कैफला त्यांनी फैलावर घेतले. कट्टरपंथियांनी केलेल्या  टिकेनंतर सध्या सोशल मीडियावर कैफच्या समर्थनाचे वारे वाहू लागले होते. त्यावर कट्टरदावाद्यांनी केलेल्या टीकेला कैफने जशास तसे उत्तर देखील दिले होते. यापूर्वी भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे संकटात सापडला होता.  मोहमद शमीने त्याच्या पत्नीसोबतचा एक फोटो फेसबुकवरुन शेअर केला होता. या फोटोमध्ये तो आपल्या पत्नीच्या खांद्यावर हात टाकून बसल्याचे दिसते. फोटोमध्ये त्याच्या पत्नीने आखूड बाह्यांचा ड्रेस परिधान केल्यामुळे नेटीझन्स शमीवर प्रतिक्रियांचे बाऊन्सर मारले होते. शमीच्या फेसबुकवरील या फोटोवर अनेकजणांनी शमीवर हल्ला चढविला होता. दरम्यान, ट्विटर माध्यमातून बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी सामाजिक मदतीसाठी कैफने उचललेले हे पाऊल स्तुत्य मानले जात आहे.