परदेशात भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवासाठी जबाबदार असलेला बचावात्मक विचारसरणीचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला हटवण्याची वेळ आली आहे, असे उद्गार भारताचे माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांनी काढले. ‘‘धोनी बचावात्मक कर्णधार आहे, त्याच्या डावपेचांमुळे प्रतिस्पर्धी संघाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळते. घरच्या मैदानांवर धोनीची कर्णधार म्हणून कामगिरी उत्तम होते, त्यात विशेष असे काही नाही. मात्र परदेशात जिंकण्यासाठी मन्सूर अली खान पतौडी यांच्यासारख्या कर्णधाराची गरज आहे,’’ असे मत अमरनाथ यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘कर्णधाराला आपल्या दमदार खेळासह संघासमोर उदाहरण ठेवणे आवश्यक आहे. धोनीला कसोटी कर्णधारपदावरून बाजूला करण्याची वेळ आली आहे. एकदिवसीय प्रकारात तो एकहाती सामना जिंकून देऊ शकतो, परंतु त्यातही त्याला पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता आहे. विराट कोहली ही जबाबदारी सांभाळू शकतो. गौतम गंभीरकडे ती क्षमता होती, मात्र संघातूनच बाहेर फेकला गेल्याने विराट हाच पर्याय आहे. १९ वर्षांखालील संघ, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद अशा विविध स्तरांवर त्याने कर्णधारपद यशस्वीरीत्या भूषवले आहे. प्रत्येक प्रकारासाठी स्वतंत्र कर्णधार असायला हवेत.’’
संघाला विजयपथावर नेण्यात अपयशी ठरणाऱ्या प्रशिक्षकाचा काय उपयोग, असा सवाल अमरनाथ यांनी केला. ते पुढे म्हणाले, ‘‘धोनीच्या नेतृत्वाविषयी चर्चा होते आहे, मात्र सातत्याने अपयशी ठरणाऱ्या प्रशिक्षकाविषयी कोणीच बोलत नाही. भारतीय संघाला भारतीय प्रशिक्षकाची गरज आहे. याआधीही भारतीय प्रशिक्षक खेळाडूंसाठी उपुयक्त ठरले आहेत.’’