मुंबई इंडियन्स हा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये सर्वात बलाढ्य संघ मानला जातो. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाने आयपीएलची पाच विजेतेपदे नावावर केली आहे. तर, मागील वर्षी दिल्लीला नमवून त्यांनी सलग दुसऱ्या विजेतेपदावर नाव कोरले. आता ते विजेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी करण्यासाठी यंदा  रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान मुंबईकर आणि भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी यंदाची आयपीएल मुंबईसाठी कशी असेल, याविषयी मत दिले आहे.

गावसकर म्हणाले, “मला वाटते की, मुंबई इंडियन्सला पराभूत करणे खूप कठीण असेल. आम्ही या संघाचे खेळाडू तयार होताना पाहिले आहेत. ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी यांचा फॉर्म भन्नाट आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत भाग घेणाऱ्या मुंबई इंडियन्समधील खेळाडूंनी आपण चांगल्या लयीत असल्याचे दाखवून दिले आहे.”

दुखापतीतून सावरून इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्याविषयीही गावसकरांनी आपले मत दिले. “हार्दिक पंड्या आता 9 षटके टाकण्यास सक्षम आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जूनमध्ये होणार आहे. या स्पर्धेला वेळ आहे, तरीही हार्दिकची कामगिरी मुंबई व भारतीय क्रिकेटसाठी चांगली आहे”, असे गावसकरांनी सांगितले.

हार्दिकचे पुनरागमन

पाठदुखीमुळे हार्दिक गोलंदाजी करण्यात सक्षम नव्हता. मात्र, दोन वर्षानंतर त्याने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत गोलंदाजी केली. त्याने मालिकेत 17 षटके टाकत 3 बळी घेतले. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात हार्दिकला गोलंदाजी करता आली नाही. मात्र, निर्णायक सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी करत भारताच्या विजयात योगदान दिले.

गतविजेत्या मुंबईचा पहिला सामना 9 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी चेन्नईत होणार आहे.