ऋषिके श बामणे, लोकसत्ता

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटचा (आयपीएल) १३ वा हंगाम धडाक्यात सुरू झाला असून, यंदाही चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. विदेशी खेळाडूंबरोबरच यंदाच्या हंगामात अनेक भारतीय क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष आहे. यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात मुंबईचे एकूण १३ खेळाडू विविध संघांचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघात मुंबईचे चार खेळाडू आहेत. मुंबईला चार वेळा ‘आयपीएल’चे विजेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्मावर साहजिकच संघाची सर्वाधिक भिस्त आहे. ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रोहित पहिल्या तीन खेळाडूंत समाविष्ट आहे. गेल्या हंगामात चेन्नईविरुद्धच्या दोन साखळी सामन्यांत प्रभावी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवकडूनही मुंबईला कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. यष्टिरक्षक फलंदाज आदित्य तरे आणि वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यांना मात्र अंतिम ११ खेळाडूंमध्ये लगेच स्थान मिळणे काहीसे कठीण वाटते.

दिल्ली कॅपिटल्स संघातही मुंबईच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. कर्णधार श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे हे फलंदाज आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे असे चार जण दिल्लीचे प्रतिनिधित्व करत आहेत. गतवर्षी अय्यरच्याच नेतृत्वाखाली दिल्लीने २०१२ नंतर प्रथमच बाद फेरी गाठली, तर उत्तेजक सेवनाच्या प्रकरणातून सावरलेला २० वर्षीय पृथ्वी यंदा सलामीवीर म्हणून छाप पाडून भारतीय संघातील स्थानासाठी दावेदारी पेश करू शकतो. भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेल्या रहाणेला यावेळी फलंदाजांनी सजलेल्या दिल्लीच्या संघात वरच्या क्रमांकावर संधी मिळणे कठीण वाटते. मात्र त्याच्यासारखा तंत्रशुद्ध फलंदाज दिल्लीकडे नाही, हेसुद्धा तितकेच खरे.

मुंबई आणि दिल्लीच्या संघातील मिळून आठ मुंबईकर खेळाडू सोडले, तर उर्वरित पाच संघांत मुंबईचा प्रत्येकी एक क्रिकेटपटू आहे. सनरायझर्स हैदराबादमध्ये मात्र मुंबईच्या एकाही खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही. मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर सलग तिसऱ्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसेल, तर युवराज सिंगसारखी फलंदाजीची शैली असणारा शिवम दुबे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचे प्रतिनिधित्व करेल.

वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या युवा विश्वचषकात (१९ वर्षांखालील) सर्वोत्तम खेळाडू ठरलेला यशस्वी जैस्वाल यंदा प्रथमच आयपीएलमध्ये खेळणार असून तो राजस्थान रॉयल्सकडून सलामीला येण्याची अपेक्षा आहे. रणजी करंडकात एका त्रिशतकासह धावांची शिखरे रचणाऱ्या सर्फराज खानला किंग्ज इलेव्हन पंजाब अंतिम ११मध्ये स्थान देणार का, हे पाहणे रंजक ठरेल. तर मुंबईच्या रणजी संघाचा संकटमोचक सिद्धेश लाडला किमान कोलकाता नाइट रायडर्समधून तरी पुरेशी संधी मिळणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र—विदर्भाचे खेळाडूही संधीच्या प्रतीक्षेत

केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, दिग्विजय देशमुख, दर्शन नळकांडे, निखिल नाइक, राहुल त्रिपाठी हे महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रतिभावान खेळाडूही यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये सहभागी झाले आहेत. त्यापैकी महाराष्ट्राच्या केदारला चेन्नईच्या संघात निश्चित स्थान मिळत असले तरी अन्य खेळाडू यंदा पुरेशा संधीच्या प्रतीक्षेत आहेत. ऋतुराज अद्यापही करोनाग्रस्त आहे, तर निखिलला कोलकाताच्या संघात स्थान मिळवण्यासाठी कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागेल. दिग्विजय आणि दर्शन यांना अनुक्रमे मुंबई आणि पंजाबचे संघ कधी खेळवणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. राहुल त्रिपाठीला राजस्थानच्या संघात सलामीवीर अथवा मधल्या फळीत फलंदाजी मिळण्याची शक्यता आहे.