भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज मुनाफ पटेल सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबईत होणाऱ्या टी-10 लीगमध्ये मुनाफ सहभागी होणार आहे, त्याआधी मुनाफने निवृत्तीची घोषणा केली. 2011 साली विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा मुनाफ सदस्य होता. मात्र फिटनेसच्या कारणांमुळे मुनाफ आपलं संघातलं स्थान राखू शकला नाही. वयाच्या पस्तीशीत प्रवेश केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करु शकेन याची आशा आता संपली आहे, या कारणासाठी मी निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं मुनाफने स्पष्ट केलं आहे.

एक काळापर्यंत मुनाफने भारतीय जलद गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली होती. अचूक टप्पा, चेंडू स्विंग करण्याची ताकद यामुळे मुनाफने भल्याभल्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. अनेकांना मुनाफ आणि ग्लेन मॅक्रा यांच्या शैलीत साम्य वाटायचं. मध्यंतरीच्या काळात मुनाफ आयपीएलमध्ये गुजरात लायन्स संघाकडूनही खेळला होता. आपल्या कारकिर्दीत मुनाफने 13 कसोटी सामन्यांमध्ये 35, 70 वन-डे सामन्यांमध्ये 86 आणि 3 टी-20 सामन्यांमध्ये 4 बळी घेतले आहेत.