राफेल नदाल आणि अँडी मरे यांनी माद्रिद मास्टर्स टेनिस स्पध्रेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. नदालने अँड्रे कुझनेत्सोव्हचा ६-३, ६-३ असा सहज पराभव केला, तर मरेला विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली. मरेने ७-६, ३-६, ६-१ अशा फरकाने ३७ वर्षीय रॅडेन स्टेपनेकवर विजय मिळवला.

नदालने पहिल्या सेटमध्ये एक वेळा कुझनेत्सोव्हची सव्‍‌र्हिस भेदली, तर दुसऱ्या सेटमध्ये दोन वेळा त्याने ही किमया साधली. गेल्या तीन सत्रांत नदालने दोन वेळा या स्पध्रेत बाजी मारली आहे. पुढील फेरीत नदालसमोर अमेरिकेच्या सॅम कुरेय आणि फ्रान्सच्या लुकास पोईले यांच्यातील विजेत्याचे आव्हान असणार आहे. मार्चमध्ये मियामी खुल्या स्पध्रेतील पहिल्या सामन्यानंतर नदालने एकही लढतीत पराभव पत्करलेला नाही. त्याचा हा सलग ११वा विजय आहे.

‘क्ले कोर्टवर अशा प्रकारची सुरुवात केल्याचा मला आनंद आहे. आणखी एक विजय, ही चांगली बातमी आहे. या स्पध्रेविषयी मी उत्साही आहे,’ असे नदालने सांगितले.

मरेला मात्र स्टेपनेकने चांगलेच झुंजवले. पहिल्या सेटमध्ये स्टेपनेकने आक्रमक खेळ केला, परंतु मरेने स्वत:ला सावरत सामन्यात पुनरागमन केले आणि पुढील फेरीत जागा पक्की केली. ‘स्टेपनेकने अप्रतिम खेळ केला, ही सोपी गोष्ट नाही,’ असे मरे म्हणाला.