01 December 2020

News Flash

नदालचा पुन्हा स्वप्नभंग

एटीपी फायनल्स विजेतेपदापासून पुन्हा दूर, मेदवेदेव अंतिम फेरीत

(संग्रहित छायाचित्र)

एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा

जागतिक क्र मवारीतील अग्रस्थानावरील सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचपाठोपाठ विक्रमी २० ग्रॅँडस्लॅम विजेता द्वितीय स्थानावरील स्पेनचा राफेल नदाल  एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला.

याबरोबरच टेनिस जगतातील नदाल आणि जोकोव्हिच हे अव्वल दोन खेळाडू जागतिक क्रमवारीत पहिल्या आठ खेळाडूंमध्ये वर्षअखेरीस होणाऱ्या महत्त्वपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी गाठू शकले नाहीत. कारकीर्दीत नदाल ही एकमेव प्रतिष्ठित स्पर्धा अद्याप जिंकू शकला नाही. नदालला उपांत्य फेरीत चौथा मानांकित रशियाच्या डॅनिल मेदवेदेवकडून पराभव स्वीकारावा लागला. नदालने पहिला सेट जिंकला होता मात्र पुढचे दोन्ही सेट गमावले. मेदवेदेवने ही लढत ३-६, ७-६, ६-३ अशी जिंकली.  दुसऱ्या सेटमध्येही नदाल ५-४ अशा चांगल्या स्थितीत होता. मात्र तेथून मेदवेदेवने बाजी मारली.

नदालने या लढतीपूर्वी खेळताना सलग ७१ सामने जिंकले होते. यंदा तो कारकीर्दीतील एटीपी फायनल्स विजेतेपदाची पोकळी भरून काढेल असे वाटत होते. मात्र मेदवेदेवने पहिल्या सेटनंतर खेळ उंचावल्याने नदालला फारशी संधी मिळाली नाही. मेदवेदेवने या विजयासह गेल्या वर्षी अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत नदालकडून पाच सेटमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली.

१ मेदवेदेवचा हा नदालवरील पहिलाच विजय ठरला.

६ या स्पर्धेत सलग सहाव्या वर्षी नवा विजेता पाहायला मिळणार आहे.

मी खूप मोठी संधी गमावली. याआधी मी अनेक दडपणाखाली लढती जिंकल्या आहेत. मात्र मेदवेदेवने चांगला खेळ केला असे म्हणेन. दुसऱ्या सेटमध्ये ५-४ अशी आघाडी असूनही विजयावर शिक्कामोर्तब करण्याची सर्वोत्तम संधी गमावली.

– राफेल नदाल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 12:16 am

Web Title: nadal back from the atp finals title again abn 97
Next Stories
1 मुंबईचे युवा तारे अपयशी!
2 धवनचा सलामीला साथीदार अगरवाल की गिल?
3 ‘हिंदकेसरी’चे पहिले मानकरी श्रीपती खंचनाळे यांची प्रकृती खालावली
Just Now!
X