एपी, पॅरिस

लाल मातीच्या कोर्टवरील अनभिषिक्त सम्राट ही ख्याती असणारा राफेल नदाल आणि १८ ग्रँडस्लॅम जेतेपदे खात्यावर असलेला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील नोव्हाक जोकोव्हिच यांच्यातील फ्रेंच खुल्या स्पध्रेची उपांत्य लढत टेनिसरसिकांसाठी अत्युच्च दर्जाची मेजवानी ठरली. युरो चषक फुटबॉलमधील इटली-टर्की यांच्यातील सलामी डावलून नदाल-जोकोव्हिच लढतीची निवड करणाऱ्या क्रीडारसिकांना चार सेटमध्ये चार तास, ११ मिनिटे रंगलेला थरार अनुभवता आला. नदालविरुद्ध विजय म्हणजे जणू माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केल्याचीच अनुभूती आहे, अशा शब्दांत जोकोव्हिचने विजयाचे विश्लेषण केले.

लाल मातीच्या कोर्टवर नदालचे वर्चस्व मोडीत काढणाऱ्या दोन ऐतिहासिक टेनिसपटूंपैकी एक म्हणजे जोकोव्हिच. जोकोव्हिचने ही किमया शुक्रवारी दुसऱ्यांदा साधली. त्यामुळे नदालचे १४वे फ्रेंच जेतेपदाचे आणि २१वे विश्वविक्रमी ग्रँडस्लॅमचे स्वप्न धुळीस मिळाले. जोकोव्हिच-नदाल यांच्यातील टेनिस कारकीर्दीमधील ही ५८वी लढत. पण जोकोव्हिचने ३०-२८ अशी सरशी साधताना भारतीय वेळेनुसार शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास नदालला ३-६, ६-३, ७-६ (४), ६-२ असे नामोहरम केले. य्मातीच्या कोर्टवर सहाव्यांदा अंतिम फेरी गाठणाऱ्या जोकोव्हिचने सामन्यानंतर हा सामना संपूर्ण कारकीर्दीतील संस्मरणीय सामना होता, असे नमूद केले.

फ्रेंच स्पध्रेतील १०८ सामन्यांपैकी नदालचा हा तिसरा पराभव. २००९मध्ये रॉबिन सॉडरलिंगविरुद्ध, तर २०१५मध्ये जोकोव्हिचनेच त्याला नमवण्याचा पराक्रम दाखवला होता.

आज जेतेपदासाठी त्सित्सिपासशी झुंज

रॉजर फेडरर दुखापतीमुळे, तर राफेल नदालची पराभवामुळे फ्रेंच जेतेपदाची वाटचाल खंडित झाली आहे. परंतु या त्रिमूर्तीपैकी ३४ वर्षीय नोव्हाक जोकोव्हिच (सर्बिया) मात्र दुसऱ्या फ्रेंच जेतेपदासाठी रविवारी ग्रीसच्या २२ वर्षीय स्टेफानोस त्सित्सिपासशी झुंजणार आहे. जोकोव्हिच कारकीर्दीतील २९व्या ग्रँडस्लॅम स्पध्रेची अंतिम फेरी खेळत आहे. त्यामुळे या लढतीत अनुभवी जोकोव्हिचचे पारडे जड मानले जात आहे. फेडरर आणि नदालच्या खात्यावर एकूण २० ग्रँडस्लॅम जेतेपदे जमा आहेत, तर जोकोव्हिच १९व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी उत्सुक आहे.

चुका घडत असतात. परंतु तुम्हाला जिंकायचे असेल, तर अशा प्रकारच्या चुका होता कामा नये. परंतु टेनिसमध्ये जो परिस्थितीशी अनुरूप खेळ करतो, तो जिंकतो. – राफेल नदाल

रोलँ गॅरोसवरील संस्मरणीय सामना म्हणून मी उल्लेख

करीन. माझ्या संपूर्ण कारकीर्दीतील तीन सर्वोत्तम सामन्यांपैकी हा एक सामना मी खेळलो. गेली १५हून अधिक वष्रे मातीच्या कोर्टवर अधिराज्य गाजवणाऱ्या नदाल या आव्हानात्मक प्रतिस्पध्र्याविरुद्ध दर्जेदार टेनिस सामना रंगला.

– नोव्हाक जोकोव्हिच