एम. सी. मेरी कोम

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरोग्याविषयी अधिक जागरूक आहेत, यात कोणतीही शंका नाही. त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच योगाला जागतिक मान्यता मिळत आहे तसेच देशभरातील जनता योगाचे धडे गिरवत आहे. पंतप्रधान स्वत: योगाभ्यास करत असून त्यांनी लोकांसमोर चांगला पायंडा पाडला आहे. ‘तंदुरुस्त भारत चळवळी’मुळे देशातील जनतेला तंदुरुस्त राहण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.

काही वर्षांपूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हाच ते म्हणाले होते, ‘‘तू मला माझ्या मुलीसारखीच आहेस आणि काहीही गरज भासेल तेव्हा माझ्याकडे येत जा.’’ पहिल्या भेटीतच त्यांच्या या वागणुकीमुळे मी भारावून गेले होते. त्यामुळे त्यांना भेटताना मला कधीही अवघडल्यासारखे वाटले नाही. नेत्यापेक्षाही एका वडीलधाऱ्या व्यक्तीला भेटल्याचे समाधान मिळत आहे. त्यामुळेच मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने कोणत्याही विषयावर बोलू शकते. समाजाच्या तसेच देशाच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे नरेंद्र मोदी म्हणजे माझ्यासाठी प्रेरणास्रोतच आहेत.

मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक शिखरे पादाक्रांत करण्यात आली, ती प्रशंसनीय आहेत. एक खेळाडू या नात्याने, खेळांचा प्रसार आणि देशातील क्रीडासंस्कृती पुढील टप्प्यावर कशी नेता येईल, हा पहिला विचार माझ्या मनात आला. आता ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून नव्या तसेच युवा गुणवत्तेला शोधण्याचे तसेच त्यांना घडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या अभियानाचा फायदा सर्वच खेळाडूंना होत आहे. स्पर्धेत यश मिळवणाऱ्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले जात आहे. याच वेगाने सरकार आणि खेळाडूंची कामगिरी होत राहिली तर येत्या काळात आपण क्रीडाक्षेत्रातही अव्वल राहू, अशी मला खात्री आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरोग्याविषयी अधिक जागरूक आहेत, यात कोणतीही शंका नाही. त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच योगाला जागतिक मान्यता मिळत आहे तसेच देशभरातील जनता योगाचे धडे गिरवत आहे. पंतप्रधान स्वत: योगाभ्यास करत असून त्यांनी लोकांसमोर चांगला पायंडा पाडला आहे. ‘तंदुरुस्त भारत चळवळी’मुळे देशातील जनतेला तंदुरुस्त राहण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.

भारतात लहान मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाण ही भयानक परिस्थिती होती. मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात घटले होते. पण मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मुलींच्या कल्याणासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमांतर्गत लोकांमध्ये मुलींच्या जन्मदराबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. माझ्या मते या स्वागतार्ह उपक्रमाचे फायदे आता दिसू लागले आहेत. येत्या काही वर्षांत मुलामुलींच्या जन्माच्या प्रमाणाबाबतीत फक्त सकारात्मक बदल घडून येतील, असे नव्हे तर लोकांचा दृष्टिकोनही बदललेला असेल. विविध क्षेत्रांत महिला उत्तुंग कामगिरी करत आहोत, हे आपण पाहात आहोत. आता महिलाही मागे नाहीत, हा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे.

स्वच्छ भारत करण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला चांगले यश मिळाले असून यात प्रत्येकाने आपापल्या परीने सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमाचा फायदा संपूर्ण देशवासीयांना झाला आहे. शहरे आणि गावे स्वच्छ होऊ लागली असून अनेक राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश हागणदारी मुक्त झाले आहेत. देश स्वच्छ राखण्यासाठी सरकारप्रमाणेच आपणही जबाबदार आहोत, याची जाणीव लोकांमध्ये झाली आहे. या उपक्रमात संपूर्ण देशवासीयांना सहभागी करण्याचे श्रेय खुद्द मोदीजींनाच जाते. प्लास्टिकचा परिणाम आता सर्वानाच जाणवू लागले आहेत. मोदींनी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात, देशवासीयांना प्लास्टिकचा वापर करण्याऐवजी कापडी आणि ज्यूटच्या पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. सर्वानी काळाची गरज ओळखून आपले पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी प्लास्टिकविरोधी मोहिमेला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

ईशान्येकडील राज्यांमध्ये अफाट गुणवत्ता असून तेथील जनतेमध्ये अथक परिश्रम करण्याची तयारी आहे. पण गेल्या अनेक दशकांपासून या भागाकडे कुणीही लक्ष दिले नाही. मात्र मोदींनी ईशान्येकडील राज्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले असून आता या भागाचा झपाटय़ाने विकास करण्याची ग्वाही दिली आहे. या भागात आता विकसनशील कामे, अनेक पायाभूत सोयीसुविधा, कृषी तसेच विविध क्षेत्रांतील प्रकल्प राबविले जात आहेत. या विकासकामांमुळे येथील लोकांचे राहणीमान उंचावणार असून भविष्यात याचे चांगले परिणाम दिसून येणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या समर्पित वृत्तीविषयी नितांत आदर असून त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपला देश विकासाची शिखरे सर करील, अशी खात्री आहे. मोदीजींना आज १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त निरोगी आणि प्रदीर्घ आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा!