गेल्या हंगामातील अपयश बाजूला सारून नव्या ऊर्जेने हंगामाची सुरुवात करण्यासाठी बार्सिलोनाचा संघ उत्सुक आहे. नव्या हंगामात त्यांची सलामीची लढत एल्च संघाशी होणार आहे. बार्सिलोनाचा माजी कर्णधार ल्युईस एन्रिक या सामन्याद्वारे संघाची सूत्रे स्वीकारणार आहे.
मार्क-आंद्रे तेर स्टेगेन आणि थॉमस व्हरमालेइन हे दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. विश्वचषक स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडूला चावल्याप्रकरणी बंदीची शिक्षा झालेला लुईस सुआरेझ या सामन्यात खेळू शकणार नाही. क्लॉडिओ ब्राव्हो आणि इव्हान रॅकिटिक पदार्पण करण्याती शक्यता आहे. लिओनेल मेस्सी आणि नेयमार यांच्यावर बार्सिलोनाची भिस्त असणार आहे. नव्या हंगामात बार्सिलोनाला व्हिक्टर वाल्देस आणि कालरेस प्युयोल यांची उणीव भासणार आहे.
‘‘एल्च संघाच्या चांगल्या कामगिरीमुळेच बार्सिलोनाला गेल्या हंगामात ला लिगा स्पर्धेच्या जेतेपदाने हुलकावणी दिली होती. बार्सिलोना अव्वल संघ आहे. शेवटच्या लढतीत आम्ही त्यांच्याविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवू शकलो होतो. यावेळी आव्हान आणखी खडतर झाले,’’ असे एल्चचा बचावपटू डेव्हिड लोम्बनने सांगितले. अन्य लढतींमध्ये अ‍ॅटलेटिको माद्रिदसमोर रायो व्हॅल्कानो संघाचे आव्हान आहे. ला लिगा स्पर्धेत नव्याने दाखल झालेल्या कोरडोबोचा मुकाबला बलाढय़ रिअल माद्रिदशी होणार आहे.