क्रिकेट हा जंटलमन लोकांचा खेळ असे नेहमीच म्हटले जाते. याचाच प्रत्यय  १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सुरू असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्यात आला. प्रत्येत क्रिकेट चाहत्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटवणारा हृदयस्पर्शी प्रसंग न्यूझीलंडच्या खेळाडूंनी घडवून आणला.

कर्क मॅकेन्झी याला क्रॅम्पमुळे चालण्यासाठी धडपडताना पाहून न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंनी त्याला मैदानाबाहेर नेले. ४३ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर धाव काढताना मॅकेन्झीला ही दुखापत झाली. तो ९९ धावांवर फलंदाजी करीत होता.

पण वेस्ट इंडीजने नववी विकेट गमावल्यानंतर त्याने पुन्हा ४८ व्या षटकात फलंदाजीसाठी तो पुन्हा मैदानात आला. मात्र, क्रिस्टियन क्लार्कनच्या पहिल्याच चेंडूवर तो बोल्ड झाला. त्यानंतर मैदानाबाहेर पडताना त्याला गंभीर वेदना होत होत्या हे त्याच्या चालण्यावरून कळत होते. तेव्हा न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंनी त्याला आपल्या हातांनी उचलून मैदाना बाहेर नेले.

क्रिकेट वर्ल्ड कप ह्या ट्विटर अकाउंट वर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.