मॅच फिक्स करण्यासाठी एक कोटी सहा लाख रुपये एवढी प्रचंड रक्कम देऊ करण्यात आल्याचा खुलासा जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचने केला आहे. सट्टेबाजांनी थेट माझ्याशी संपर्क साधला नाही. त्यांनी माझ्या सहयोगींना गाठले. २००७ मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेली लढत फिक्स करण्यासाठी प्रचंड रकमेचा प्रस्ताव देण्यात आल्याचे जोकोव्हिचने स्पष्ट केले.
तो पुढे म्हणाला, ‘‘अव्वल स्तरावर फिक्सिंगला काहीही स्थान नाही. माझ्या माहितीप्रमाणे उच्च स्तरावर फिक्सिंग होऊ शकत नाही. चॅलेंजर दर्जाच्या स्पर्धावेळी फिक्सिंग होऊ शकते. परंतु याबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही. असे गैरप्रकार रोखण्यासाठी संघटना आणि पदाधिकारी असून ते कार्यवाही करतील याची खात्री आहे.’’
यासंदर्भात रॉजर फेडररला विचारले असता तो म्हणाला, ‘‘खेळाची प्रतिमा मलिन करणारे ते खेळाडू कोण आहेत हे समजायला हवे. ते खेळाडू आहेत, सहयोगी आहेत का आणखी कोणी हे जगासमोर यायलाच हवे. एकेरीचे खेळाडू आहेत की दुहेरीचे हेही स्पष्ट व्हायला हवे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून, खेळभावनेची जपणूक करणे खेळाशी संलग्न सर्वाचे कर्तव्य आहे.’’