पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार सरफराज अहमद सोमवारी ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावरुन सोमवारचा दिवस त्याच्यासाठी फारसा चांगला नव्हता असेच म्हणावे लागेल. सरफराजच्या बाद होण्याच्या पद्धतीवरून सोशल मीडियावर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. सरफराज स्टंपिंगपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि तो बाद झाला. सोशल मीडियावर लोकांनी त्याच्या याच गोष्टीची टेर उडवायला सुरूवात केली.

सरफराज ज्या पद्धतीने मैदानावर पडला त्याचपद्धतीने काही वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी पडला होता. धोनीने स्वतःची विकेट वाचवण्यासाठी मैदानात पाय पसरत स्वतःला झोकून दिले आहे. अनेकदा त्याला यशही मिळाले आहे. पण सरफराजच्या हाती मात्र अपयशच आले. म्हणूनच तो सोशल मीडियावर ट्रोल झाला. अनेकांनी त्याला दुसऱ्यांची नक्कल केल्यावर काय होते याचे उपदेश दिले. एका युझरने म्हटले की, ‘सरफराज मैदानात योगा तर करत नाहीये ना?’

सोमवारी पाकिस्तान- न्युझीलँडमध्ये पहिला टी- २० सामना झाला. पाकिस्तानने १९.४ षटकात १०५ धावा केल्या. पाकिस्तानचे १० गडी बाद झाले. तर न्युझीलँडनने हा १५.५ षटकात ३ गडी राखत १०६ धावा करत सामना जिंकला. सरफराज मैदानात पाय रोवून उभा होता. मिशेल सँटनर गोलंदाजी करत होता. सरफराजला तो बॉल थोडा स्वीप करायचा होता. मात्र या दरम्यान त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. यादरम्यान त्याने आपली विकेट वाचवण्याचा पूरेपुर प्रयत्न केला. मात्र यात त्याला फारसे यश मिळाले नाही. विकेटकीपर ग्लेन फिलिप्सने त्याला बाद केले. सरफराजने ९ चेंडून १४ धावा केल्या, यात एक चौकारही होता.