कोनेरू हम्पी हिने शानदार कामगिरी करत महत्त्वाच्या क्षणी विजय मिळवल्यामुळे भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पोलंडचा पराभव करून फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या अंतिम फे रीत धडक मारली आहे. आता रविवारी रंगणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताला रशिया आणि अमेरिका यांच्यातील विजेत्याशी दोन हात करावे लागतील.

नियमित खेळादरम्यान दोन्ही संघांनी प्रत्येकी एक फेरी जिंकल्यानंतर टायब्रेकमध्ये जलद प्रकारातील जगज्जेती कोनेरू हम्पी हिने मोनिका सोको हिचा पराभव केला. काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना हम्पी हिने प्रतिस्पर्धीवर मात करत भारताला अंतिम फे रीत स्थान मिळवून दिले.

पहिल्या फे रीत २-४ असा पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघासाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. पण भारताने दुसऱ्या फे रीत ४.५-१.५ असा दमदार विजय मिळवत जोमाने पुनरागमन केले. निर्णायक टायब्रेक लढतीत हम्पीने भारतासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली.

पाच वेळच्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने दुसऱ्या फेरीत यान-क्रिस्तॉफ डुडा याच्यावर ७८ चालींत विजय मिळवला. त्यानंतर कर्णधार विदित गुजराथीने झेगोर्झ गाजेस्की याच्यावर तर हम्पी आणि द्रोणावल्ली हरिकाने विजय मिळवले. आर. प्रज्ञानंदला हार पत्करावी लागली तर वंतिका अग्रवालने अलिजा सिल्विका हिच्याविरुद्ध बरोबरी पत्करली.

पहिल्या फेरीत आनंदला डुडाने पराभूत केले होते. विदितला रॅडोस्लाव्ह वोतासेककडून पराभूत व्हावे लागले होते. दिव्या देशमुखला अलिसाने हरवले होते. त्यानंतर हम्पी आणि हरिकाने अनुक्रमे सोको आणि करिना सिफिकाविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला होता. पण निहाल सरिनने भारताला एकमेव विजय मिळवून दिला होता.