News Flash

Australian ball-tampering scandal : बँक्रॉफ्टचे घूमजाव!

चेंडू फेरफार प्रकरणात गोलंदाजांच्या सहभागाबाबत पुरावा नसल्याचे मत

| May 19, 2021 01:28 am

चेंडू फेरफार प्रकरणात गोलंदाजांच्या सहभागाबाबत पुरावा नसल्याचे मत

सिडनी : ऑस्ट्रेलियन क्रिकेटला काळिमा फासणाऱ्या चेंडू फेरफार प्रकरणासंबंधी सलामीवीर कॅमेरून बँक्रॉफ्टने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत संघातील काही गोलंदाजांचाही समावेश होता, असे विधान बँक्रॉफ्टने रविवारी केले. मात्र ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने सोमवारी रात्री केलेल्या चौकशीत यासंबंधी आपल्याकडे गोलंदाजांच्या सहभागाविषयी कोणताही ठोस पुरावा नसल्याचे बँक्रॉफ्टने स्पष्ट केले आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २०१८मध्ये केपटाऊन येथे झालेल्या कसोटीदरम्यान बँक्रॉफ्टने पिवळसर रंगाच्या वस्तूने चेंडूशी फेरफार केली. यामागे ऑस्ट्रेलियाचा त्यावेळचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा हात होता. त्यामुळे बँक्रॉफ्टला नऊ महिने, तर स्मिथ आणि वॉर्नर यांना वर्षभरासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले.

बँक्रॉफ्ट सध्या इंग्लिश कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत डरहॅम संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान बँक्रॉफ्टने चेंडू फेरफार प्रकरणाविषयी भाष्य केले. निलंबनाच्या काळामुळे क्रिकेटकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात कोणता बदल झाला, या प्रश्नावर उत्तर देताना या घटनेत माझ्यासह वॉर्नर, स्मिथ यांनी चूक मान्य करून पुढाकार घेतल्यामुळे गोलंदाज लपले गेल्याचे सर्वानाच ठाऊक आहे, असे वक्तव्य बँक्रॉफ्टने केले. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघटनेने त्वरित चौकशीचे आदेश जाहीर केले. आफ्रिकेविरुद्धच्या त्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघात पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन या गोलंदाजांचा समावेश होता.

‘‘चेंडू फेरफार प्रकरणाशी निगडित बँक्रॉफ्टशी केलेल्या चर्चेदरम्यान त्याने स्पष्टपणे याविषयी आपल्याला अधिक माहिती नसल्याचे सांगितले. त्याशिवाय या कारस्थानात गोलंदाजांचा समावेश आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे ठोस पुरावा नसल्याचे बँक्रॉफ्ट म्हणाला,’’ असे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने मात्र या प्रकरणाशी आणखी कोणाचा संबंध असल्यास त्यांनी स्वत:हून समोर यावे, असेही बजावले आहे.

बँक्रॉफ्टच्या विधानामुळे आमच्या प्रामाणिकपणावर शंका -कमिन्स

सिडनी : कॅमेरून बँक्रॉफ्टने चेंडू फेरफार प्रकरणाविषयी गोलंदाजांनाही कल्पना असल्याचे मत व्यक्त केल्यामुळे मला धक्का बसला, असे ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा गोलंदाज पॅट कमिन्सने सांगितले. ‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान मानतो. चेंडू फेरफार प्रकरणाविषयी मला खरंच काहीही माहीत नव्हते. परंतु बँक्रॉफ्टच्या वक्तव्यामुळे येथील काही क्रीडा पत्रकार आणि माजी क्रिकेटपटूंकडून आमच्या प्रामाणिकपणावर शंका उपस्थित करण्यात आली. त्यामुळे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,’’ असे कमिन्स म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 1:28 am

Web Title: opener cameron bancroft on ball tampering scandal zws 70
Next Stories
1 तौक्ते वादळात वानखेडे स्टेडियमचे नुकसान
2 सुशीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
3 “२०११च्या वर्ल्डकपनंतर मला आणि माझ्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाही होती”
Just Now!
X