खटके, आवारे, खत्री, नानजकर, पोवार यांना राज्य क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर
कुस्तीमधील ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि मार्गदर्शक पंढरीनाथ पठारे यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती जीवनगौरव राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याचप्रमाणे युवराज खटके (अॅथलेटिक्स), बाळासाहेब आवारे (कुस्ती), नितीन खत्री (तायक्वांदो), जगदीश नानजकर (खो-खो) आािण अनिल पोवार (पॅराअॅथलेटिक्स) या पाच जणांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत २०१८-१९ या वर्षांसाठी ६३ जणांना शिवछत्रपती पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली. यात ४८ खेळाडूंचा (२३ पुरुष, २५ महिला) समावेश आहे. येत्या शनिवारी, २२ फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे.
गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ३०६ खेळाडूंनी पदक जिंकत अग्रस्थान मिळवून दिले. या विजेत्यांना एकूण सव्वातीन कोटी रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
‘‘जपान, जर्मनी, अमेरिका इतकेच कशाला कोरियासारख्या देशातही क्रीडा क्षेत्राला खूप महत्त्व दिले जाते. भारतातही हे महत्त्व आहेच. यात महाराष्ट्रसुद्धा खेळांमध्ये सातत्याने अग्रेसर राहण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेसुद्धा अधिकाधिक आर्थिक मदत देण्यासाठी पाठीशी आहेत. केंद्र सरकारकडूनही आर्थिक पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा आहे,’’ असे सुनील केदार यांनी सांगितले. मुलींना खेळांमध्ये अधिक संधी मिळावी, त्यांना पाठबळ मिळावे, यासाठी ‘गो गर्ल गो’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.
संघटकाच्या पुरस्काराबाबत स्वतंत्र विचार!
शिवछत्रपती पुरस्कार हे खेळाडूंसदर्भात आहेत. संघटक-कायकर्त्यांच्या पुरस्काराबाबत त्यामुळे आम्ही स्वतंत्र विचार करीत आहोत, असे सुनील केदार यांनी सांगितले. यंदापासून शिवछत्रपती पुरस्कारांमधून संघटक-कायकर्त्यांचा पुरस्कार काढून टाकण्यात आला आहे.
मार्गदर्शकाच्या पुरस्काराचे नियम आणखी कडक!
मार्गदर्शकाच्या पुरस्कारासंदर्भातील नियम आणखी कडक करण्यात येणार आहेत. तो चुकीच्या व्यक्तीला दिला जाऊ नये, यासंदर्भात आमची चर्चा झाली. पुढील वर्षीय पुरस्कारांमध्ये हे बदल दिसून येतील, असे केदार यांनी सांगितले.
तरुणांच्या जीवनशैलीबाबत चिंता!
तरुणांचे आठ तास झोपेसाठी आणि आठ तास इंटरनेटच्या वापरात जातात. मग त्यांच्याकडे आठ तासच उरतात आणि हाच माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे. तंत्रज्ञानाचा वापर करू नये, असे मी अजिबात म्हणणार नाही. महात्मा गांधी यांनीसुद्धा हीच वाट स्वातंत्र्यापूर्वी देशाला दाखवली होती. त्यामुळे तरुणांचे जगण्याचे समीकरण बदलून मैदानाकडे नेण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असे केदार यांनी यावेळी सांगितले.
कुस्तीपटूंचे कैवारी
पंढरीनाथ (अण्णासाहेब) तुकाराम पठारे यांचा जन्म पुण्यातील खराडी या लहानशा नदीकाठावर वसलेल्या गावात गरीब शेतकरी कुटुंबात झाला. ७२ वर्षीय पठारे यांचे कुस्ती आणि कबड्डी या दोन खेळांवर लहानपणापासून उपजतच प्रेम होते. ते कुस्ती मोठय़ा स्तरावर खेळले नसले तरी कुस्तीत मार्गदर्शक म्हणून त्यांनी नाव कमावले. इतकेच नाही तर अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेता राहुल आवारे यांसारख्या असंख्य कुस्तीपटूंना अण्णासाहेब पठारे यांनी घडवले. पुण्यातील गोकुळ वस्ताद तालीमच्या स्थापनेपासून ते आता आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल घडवण्यात पठारे यांचे मोलाचे योगदान आहे. फक्त कुस्तीपटूंनाच नाही तर अन्य खेळांतील गुणवानांच्या आर्थिक मदतीला धावून जाणारे अशीच अण्णासाहेब पठारे यांची ओळख आहे.
शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांची यादी
- जीवनगौरव राज्य क्रीडा पुरस्कार : पंढरीनाथ पठारे (कुस्ती)
- उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार : युवराज खटके (अॅथलेटिक्स), बाळासाहेब आवारे (कुस्ती), नितीन खत्री (तायक्वांदो), जगदीश नानजकर (खो-खो), अनिल पोवार (पॅराअॅथलेटिक्स)
खेळाडूंचे क्रीडा पुरस्कार : हर्षद हातणकर, कविता घाणेकर (खो-खो), रिशांक देवाडिगा, सोनाली शिंगटे, गिरीश इरनाक (कबड्डी), अश्विन पाटील, मधुरा वायकर (सायकलिंग), पवन जयस्वाल, प्रिया गोमासे (आटय़ापाटय़ा), अभिजित कटके, अंकिता गुंड (कुस्ती), सुलतान देशमुख (कयाकिंग-कनोइंग), प्रियांका खेडकर (व्हॉलीबॉल), सिद्धांत कांबळे, साक्षी माथवड (स्केटिंग), प्रियांका गौडा (वुशू), हर्षल वखारिया, अवंतिका चव्हाण, सिद्धार्थ परदेशी, मानसी गावडे (जलतरण / डायव्हिंग / वॉटरपोलो), सुकमनी बाबरेकर (तिरंदाजी), किसन तडवी, अर्चना आढाव (अॅथलेटिक्स), श्रुती अरविंद (बास्केटबॉल), पियुष आंबुलकर, इश्वरी गोतमारे (सॉफ्टबॉल), गौरव जोगदंड, आदिती दांडेकर, श्रावणी राऊत (जिम्नॅस्टिक्स), वेदांगी तुळजापूरकर (नेमबाजी), तुषार आहेर, दामिनी रंभाड (तलवारबाजी), अनंता चोपडे (बॉक्सिंग), सूर्यभान घोलप, जागृती शहारे (नौकानयन), नीरज चौधरी, रुचिका भावे (तायक्वांदो), विघ्नेश देवळेकर, संयोगिता घोरपडे (बॅडमिंटन), गणेश शिंदे, हिमानी परब (मल्लखांब), योगेश मेहर, करुणा वाघमारे (शरीरसौष्ठव), आकाश चिकटे (हॉकी), श्वेता शरवेगार (यॉचिंग), गिरीजा बोडेकर (बेसबॉल), नीलेश गराटे, सोनाली गीते (पॉवरलिफ्टिंग)
- खेळाडूंचे क्रीडा पुरस्कार (साहसी) : प्रभात कोळी, शुभम वनमाळी, अपर्णा प्रभुदेसाई, सागर बडवे
- खेळाडूंचे क्रीडा पुरस्कार (दिव्यांग) : स्वप्निल पाटील, पार्थ हेंद्रे, जयदीपकुमार सिंह, सायली पोहरे, वैष्णवी सुतार.
जीवनगौरव पुरस्कारासाठी माझी निवड व्हावी ही अनेकांची इच्छा होती. अखेर हा पुरस्कार मला मिळाल्याचा आनंद आहे. गेली अनेक वर्षे कुस्ती खेळासाठी मी सर्वतोपरी योगदान देण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील छोटय़ाशा खराडी गावातून माझा प्रवास सुरू झाला. लहानपणापासूनच मी तालमीत उतरून कुस्तीचे धडे गिरवले होते. मात्र नंतर मार्गदर्शकाचीच भूमिका बजावली. गोकुळ कुस्ती संकुलासाठी नेहमीच सर्वतोपरी योगदान देत आलो आहे आणि यापुढेही देत राहीन.
– पंढरीनाथ पठारे