‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरुन हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर बीसीसीआयने कारवाई केली आहे. चौकशीचा अहवाल येईपर्यंत दोन्ही खेळाडू बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेत खेळू शकणार नाहीयेत. मात्र भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरनेही हार्दिक पांड्याचं जोरदार समर्थन केलं आहे. तो ESPNCricinfo या संकेतस्थळाशी बोलत होता.

अवश्य वाचा – Video : धोनी….धोनी…. जेव्हा मेलबर्नच्या मैदानात धोनीच्या नावाचा गजर होतो

“हार्दिक पांड्याने संघात लवकर पुनरागमन करावं. हा निर्णय कोण घेणार आहे याची मला कल्पना नाही मात्र जो कोणी निर्णय घेणार असेल त्याने लवकर घ्यावा. त्याने कोणताही गुन्हा केलेला नाहीये, त्याच्या हातून चूक घडली आहे जी त्याने मान्यही केली. त्यामुळे लोकांनी आता या प्रकरणावर पडदा टाकायला हवा.” अजित आगरकरने हार्दिक पांड्याचं समर्थन केलं.

तो आतापर्यंत 3 सामने खेळू शकलेला नाहीये. यापुढचे सामनेही तो चौकशीमुळे खेळू शकणार नाही. गेल्या दोन-अडीच वर्षाच्या कालावधीत त्याने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. तो भारतीय संघात योग्य समतोल राखतो, त्यामुळे हार्दिक पांड्याचं संघात पुनरागमन होणं गरजेचं असल्याचं आगरकर म्हणाला. हार्दिक पांड्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घ्यावी लागल्यानंतर विजय शंकरची संघात निवड करण्यात आली होती. वन-डे मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मात करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. यानंतर भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार असून, या मालिकेत भारत 5 वन-डे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे.

अवश्य वाचा – विराट कोहली वन-डे क्रिकेटमधला सर्वोत्तम खेळाडू – मायकल क्लार्क