अपंगांच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या ढिसाळ संयोजनाला जबाबदार असलेल्या भारतीय पॅराऑलिम्पिक समितीची (पीसीआय) केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मान्यता काढून घेतली आहे तसेच आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक महासंघानेही त्यांच्यावर बंदी घातली आहे असे केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनवाल यांनी लोकसभेस सांगितले.
सोनवाल यांनी सांगितले की, ‘‘गाझियाबाद येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेच्या वेळी खेळाडूंकरिता शौचालय, पिण्याचे पाणी, निवास आदी प्राथमिक व्यवस्थाही निकृष्ट दर्जाच्या होत्या. स्पर्धेचे संयोजन अतिशय ढिसाळपणे करण्यात आले. अनेक खेळाडूंनी त्याबाबत मंत्रालयाकडे तसेच आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक महासंघाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांची दखल घेत महासंघाने पीसीआयवर बरखास्तीची कारवाई केली व त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने पीसीआयची संलग्नता काढून घेतली आहे.’’
मंत्रालयाने ही कारवाई करण्यापूर्वी स्पर्धेबाबत अहवाल मागविला होता. त्याआधारे पीसीआयला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सदोष व्यवस्थापनाबद्दल पीसीआय जबाबदार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.