सध्या दुबईत सुरु असलेल्या आशिया चषकात भारताने दोन सामन्यांमध्ये पाकिस्तानवर मात केली. दोन देशांमध्ये सध्या कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सामने खेळवले जात नाहीयेत, मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड दोन देशांमध्ये क्रिकेट मालिकेसाठी आग्रही असल्याचं समजतंय. २० सप्टेंबररोजी दुबईत पार पडलेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानने आपली भूमिका मांडल्याचं कळतंय. मात्र बीसीसीआयने यावर आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाहीये. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनिर्वाचित अध्यक्ष एहसान मणी यांनी याआधीच भारत-पाक मालिकेसाठी आपण सकारात्मक असल्याचं जाहीर केलं होतं. “क्रिकेट आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन भिन्न बाजू आहेत. कारगिल युद्धादरम्यानही दोन्ही देशांमध्ये क्रिकेटचे सामने सुरु होते. त्यामुळे दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी चर्चेमधून या प्रश्नावर मार्ग काढायला हवा.” प्रसारमाध्यमांसमोर मणी यांनी आपली भूमिका जाहीर केली होती.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : …म्हणून सामना सुरु असतानाच मुशर्रफ यांनी स्टेडियममधून काढला पळ

आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीदरम्यान माझी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक बैठक झाली. आगामी वर्षात कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरु होण्याआधी भारत व पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका त्रयस्थ ठिकाणी खेळली जावी यासाठी आयसीसीही आग्रही आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातही कदाचित भारत-पाकिस्तान सामने क्रिकेट रसिकांना पहायला मिळू शकतात. मणी यांनी पाक क्रिकेट बोर्डाची भूमिका मांडली. पाकिस्तानकडून होत असलेल्या अतिरेकी कारवायांमुळे सध्या भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेला केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. मात्र पाकिस्तानमध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर गोष्टी बदलतात का? याचसोबत बीसीसीआय आपल्या भूमिकेत बदलं करतं का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – हिटमॅन-गब्बरच्या शतकी खेळीपुढे पाकिस्तानची धुळधाण, ९ गडी राखून विजय मिळवत भारत अंतिम फेरीत