करोनामुळे फॉर्म्युला-वन हा खेळ आर्थिक संकटात सापडला असून त्यावर उपाय म्हणून पुढील मोसमात खर्च कमी करण्याची तयारी फॉर्म्युला-वनमधील सर्व संघांनी दाखवली आहे. त्यामुळे पुढील मोसमात प्रत्येक संघाला १४५ दशलक्ष डॉलर इतकाच खर्च करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

यंदाच्या मोसमातील २२ पैकी १० शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत अथवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे फॉर्म्युला-वनमधील १० संघांनी नवा करार सादर केला आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, संघांनी २०२१ मोसमासाठी कमीत कमी खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले आहे. त्यात ३० ते १४५ दशलक्ष डॉलर खर्च करण्याचे निश्चित केले आहे. त्याचबरोबर २०२२मध्ये हा खर्च १४० दशलक्ष डॉलर तर २०२३ ते २०२५ या कालावधीत १३५ दशलक्ष डॉलर इतका आणण्यात येईल. मात्र या अंदाजपत्रकाला अद्याप मान्यता मिळाली नाही. मात्र पुढील आठवडय़ात जागतिक मोटारस्पोर्ट्स महासंघ (फिया) त्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे.

यंदाच्या मोसमात संघांना १७५ दशलक्ष डॉलर इतका खर्च करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण करोनामुळे फॉर्म्युला-वन खेळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आर्थिक चणचणीमुळे फॉर्म्युला-वनमधून अनेक संघ बाहेर पडतील, अशी भीती या महिन्याच्या सुरुवातीला फॉर्म्युला-वनचे व्यवस्थापकीय संचालक रॉस ब्राऊन यांनी व्यक्त केली होती.