इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

पृथ्वी शॉ कामगिरी खालावलेली असताना सराव करणे टाळायचा. परंतु आता त्याने नक्कीच स्वत:चा मानसिक दृष्टिकोन बदलला असल्याची अपेक्षा आहे, असे मत दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने व्यक्त केला.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामाला ९ एप्रिलपासून प्रारंभ होणार असून श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत यंदा मुंबईकर पृथ्वीवर दिल्लीच्या फलंदाजीची भिस्त असणार आहे. विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक धावा करतानाच संघाला विजेतेपदाची दिशा दाखवल्यामुळे पृथ्वीकडून पाँटिंगसह दिल्लीच्या चाहत्यांना फार अपेक्षा आहेत. परंतु सोमवारी पाँटिंगने पृथ्वीविषयी एका गोष्टीचा खुलासा केला.

‘‘मागील हंगाम पृथ्वीसाठी फारसा लाभदायक नव्हता. सुरुवातीच्या काही सामन्यांत धावा केल्यानंतर सलग चार-पाच लढतींमध्ये दोन आकडी धावसंख्या गाठण्यातही तो अपयशी ठरला. त्यामुळे सरावादरम्यान त्याने अनेकदा फलंदाजी करण्यास नकार दिला. त्याची ही वृत्ती पाहून मीसुद्धा आश्चर्यचकित झालो,’’ असे पाँटिंग म्हणाला.

‘‘प्रशिक्षक या नात्याने मला त्याकडे लक्ष देणे गरजेचे होते. अनेकदा त्याची समज काढल्यानंतरही त्याने फलंदाजी करण्याचे टाळले. त्यामुळे आता तो तसे करणार नाही, अशी अपेक्षा आहे. कारण तो एका वेगळ्या दर्जाचा खेळाडू असून त्याची बॅट तळपल्यास दिल्लीचे अर्धे काम सोपे होईल,’’ असेही पाँटिंगने सांगितले. याशिवाय पृथ्वीच्या फलंदाजी तंत्रात आता सुधारणा झाली असून लवकरच तो भारतीय संघात स्थान मिळवेल, असा विश्वासही पाँटिंगने व्यक्त केला.