भारताचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराचा इंग्लंडमधील ग्लुस्टरशायर संघासोबतचा कौंटी क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सहा सामन्यांसाठीचा करार करोनामुळे रद्द करण्यात आला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) त्यांच्या देशातील सर्व प्रकारचे व्यावसायिक क्रिकेट २८ मेपर्यंत रद्द केले आहे. ‘‘ग्लुस्टरशायर या बलाढय़ संघाकडून यंदाच्या हंगामात पुजारासारखा फलंदाज खेळताना आमच्या प्रेक्षकांना बघायला मिळणार नाही. आमच्या संघाचे हे १५०वे वर्ष असल्याने खेळाडूंसह पाठिराख्यांची निराशा होणे स्वाभाविक आहे,’’ असे ग्लुस्टरशायर संघव्यवस्थापनाने सांगितले.