प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरुचं स्थान महत्वाचं असतं. एका खेळाडूचं करिअर घडवण्यासाठी त्याचा प्रशिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई करणारी भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं आपले प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचे आभार एका व्हिडिओच्या माध्यमातून मानले आहेत. ‘I Hate My Teacher’ असं या व्हिडीओचं नाव असून सध्या सोशल मीडियावर सिंधूच्या या व्हिडीओला जबरदस्त प्रसिद्धी मिळत आहे. सिंधूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या व्हिडिओची माहिती दिली आहे.

“माझं स्वप्न साकार होण्यासाठी गोपीचंद सरांनी आतापर्यंत जीवापाड मेहनत घेतली आहे. मला आत्मविश्वास देण्याचं काम गोपीचंद सर करत आले आहेत. त्यामुळे या व्हिडिओची निर्मिती करताना मला खूप आनंद होत आहे. आज आंतराष्ट्रीय पातळीवर मी जी काही चांगली कामगिरी केली आहे, त्याचं संपूर्ण श्रेय गोपीचंद सरांनाच जातं”, असं म्हणत सिंधूनं त्यांचे आभार मानले.

हैदराबादच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या सिंधूला गोपीचंद यांनी प्रशिक्षण देत एक आंतराष्ट्रीय दर्जाची क्रीडापटू म्हणून ओळख मिळवून दिली. सिंधूने नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.