भारताची ऑलम्पिक पदक विजेती पी. व्ही सिंधू हिनं ‘मी निवृत्त होतेय’ अशी पोस्ट टाकत सर्वांनाच धक्का दिला आहे. सोशल मीडियावर सिंधूनं तीन पानं पोस्ट करताना पहिल्या पेजवर निवृत्त होत असल्याचं म्हटलं आहे. सिंधूच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर तिच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आलं आहे. खरं तरं सिंधूनं बॅडमिंटनमधून संन्यास घेतला नाहीय. पण करोना महामारीच्या जनजागृतीसाठी हा I retire वाला मार्ग अवलंबला आहे.

सिंधूनं पहिल्या पानावर म्हटलेय की, ‘डेनमार्क ओपन अखेरचा स्ट्रॉ होता. मी निवृत्ती घेतली आहे.’ त्यानंतर पुढील पानात सिंधूनं लिहिलेय की, ‘गेल्या काही दिवसांपासून मनात उठणाऱ्या वादळाबद्दल बोलायचा विचार करत होते. त्यासोबत तोडगा काढताना संघर्ष होतो. पण आज माझ्या मनातील भावना मी इथं लिहून,  “आता बस्स झालं…” ते सांगत आहे. कदाचीत ही पोस्ट अखेरपर्यंत वाचल्यानंतर तुम्ही माझ्या समर्थनार्थ असाल अशी आशा आहे. ‘

पोस्टमध्ये पुढे लिहिलेय की, ‘या महामारीनं माझे डोळे उघडले आहेत. विरोधकांसोबत लढण्यासाठी मेहनत करु शते. अखेरच्या क्षणांपर्यंत सामन्यात प्रयत्न करु शकते. याआधीही मी हा कारनामा केला आहे. मात्र, पुन्हा एकदा मला तसाच करिश्मा करायचा आहे. पण मी न दिसणाऱ्या विषाणूला कसं हारवू. ज्यानं जगभरात आपला प्रभाव वाढवला आहे. घरात बसून अनेक महिने उलटले पण अद्यापही बाहेर जायचे असल्यास स्वत:लाच प्रश्न विचारावा लागतो.या सर्वांचा विचार करत असताना, अनेकांचं मन तुटलेल्या कथा ऑनलाइन वाचल्या. तुम्हाला मी प्रश्न विचारतेय, आपण खरचं जगतोय का? डेनमार्क ओपनमध्ये भारताचं प्रतिनिधित्व न करणं ही शेवटची वेळ होती.’

सिंधूनं शेवटच्या पानावप म्हटले की, ‘सध्या परिस्थितीत असलेल्या अशांतीच्या भावनेतून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी या नकारात्मकता, सततचं भय आणि अनिश्चितत्‍तेतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’

आपल्याला हार माणून चालणार नाही. सध्यापेक्षा चांगली तयारी करण्याची गरज आहे. सर्वजण मिळून या विषाणूचा पराभव करुयात. सध्या आपण देत असेला लढा पुढच्या पिढीचं भविष्य ठरवेल, असं सिंधू म्हणाली आहे.