नवी दिल्ली : पुढील आठवडय़ापासून प्रतिष्ठेची जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा सुरू होणार असून ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिचा भर हा दुखापतीतून सावरण्याकडे तसेच आपला बचावात्मक खेळ सुधारण्यावर असणार आहे.

सिंधूने जागतिक स्पर्धेत दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली असली तरी तिला सुवर्णपदकाने कायम हुलकावणी दिली आहे. स्वित्र्झलडमधील बॅसेल येथे १९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या आशा सिंधूवरच आहेत. गेल्या दोन स्पर्धामध्ये सिंधूला अंतिम फेरीत जपानची नोझोमी ओकुहारा आणि स्पेनच्या कॅरोलिना मरिन हिच्याकडून पराभूत व्हावे लागले होते.

या वेळी सुवर्णपदकापर्यंत झेप घेशील का, असे विचारल्यावर सिंधू म्हणाली, ‘‘या स्पर्धेसाठी कसून तयारी केली आहे. माझ्याकडून चांगली कामगिरी होईल, अशी आशा आहे. माझ्यावर कोणतेही दडपण असणार नाही. मी सध्या बचाव, शारीरिक तंदुरुस्ती आणि मैदानावरील कौशल्य याच्यावर मेहनत घेत आहे. या तिघांचा मेळ जुळून येईल, अशी आशा आहे.’’

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अकाने यामागुची हिचा विजेतेपदासाठी मुख्य अडसर असणार आहे. याविषयी सिंधू म्हणाली, ‘‘यामागुचीविरुद्ध मी इंडोनेशिया स्पर्धेत खेळले होते. ती आक्रमक खेळाडू असून प्रदीर्घ रॅलीवर भर देते. मात्र मी तिच्या आक्रमकतेने प्रभावित झालेले नाही. तिच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मी सज्ज आहे.’’

पाचव्या मानांकित सिंधूला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असून तिचा दुसरा सामना चायनीज तैपेईची पाय यू पो किंवा बल्गेरियाची लिंडा झेटचिरी यांच्यातील विजेतीशी होईल. सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत तैपेईच्या ताय झु यिंग हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

माझ्याकडून नेटवर होणाऱ्या चुका मी सुधारत आहे. दक्षिण कोरियाच्या नव्या प्रशिक्षिका किम जी-ह्य़ून यांनी माझ्या अनेक चुका समजावून सांगितल्या. त्यांचा दृष्टिकोन, विचारसरणी वेगळी असून त्याचा मला फायदा होत आहे. – पी. व्ही. सिंधू