मुकुंद धस

गतविजेत्या रेल्वेच्या महिलांनी तमिळनाडूचा ८८-७१ असा पराभव करून ६९व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावताना आपल्या २९व्या विजेतेपदास गवसणी घातली.

तमिळनाडूच्या दर्शिनी, सत्या आणि श्रीविद्याने आक्रमणात सुरेख समन्वय राखत गुण करण्याचा सपाटा लावला होता. त्यांच्या वेगवान आक्रमणापुढे रेल्वेचे खेळाडू पूर्णपणे गोंधळून गेले आणि त्याचा अचूक फायदा उठवत तमिळनाडूने पहिल्या सत्राअंती २३-१८ अशी आघाडी घेतली. तमिळनाडूच्या भरवशाच्या पुष्पाला सूर गवसला नसला तरी सत्या आणि श्रीविद्याने सुरेख कामगिरी बजावून तिची उणीव जाणवू दिली नाही. दुसऱ्या सत्रात मात्र रेल्वेने आपला बचाव भक्कम करत दर्शिनी आणि निशांतीची कोंडी केली आणि दुसऱ्याच मिनिटात २५-२३ अशी आघाडी घेतली. तमिळनाडूच्या सत्याने आपल्या उंचीचा फायदा घेत महत्त्वपूर्ण गुण मिळवून नवव्या मिनिटाला ३८-३८ अशी बरोबरी साधून दिली.

मध्यंतराच्या ४२-४० अशा छोटय़ा आघाडीनंतर मात्र रेल्वेने विजेत्यास साजेसा खेळ केला. उंच राजप्रियदर्शिनी आणि नवनिताने खेळाची सूत्रे हाती घेत संघाची आघाडी वाढवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. भांदाव्याच्या आगमनानंतर तर सामना पूर्णपणे विजेत्यांच्या बाजूने झुकला. भांदाव्याच्या  अचूक नेमबाजीमुळे तमिळनाडूचा बचाव कोसळला. तत्पूर्वी, तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत केरळने छत्तीसगडचा ७९-७३ असा पराभव केला.