शाम्स मुलानीचे चार बळी

मुंबईने रणजी करंडकात ‘ब’ गटातील लढतीत तमिळनाडूविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुण मिळवले. मुंबईच्या पहिल्या डावातील ४८८ धावांना उत्तर देताना तमिळनाडूचा पहिला डाव अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात ३२४ धावांत गारद झाला. याबरोबरच मुंबईने यजमानांना फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात दिवसअखेर तमिळनाडूच्या २ बाद ४८ धावा झाल्या. मुंबईकडून डावखुरा फिरकीपटू शाम्स मुलानीने सर्वाधिक चार बळी घेतले.

तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात रविचंद्रन अश्विन ७९ धावा काढून बाद झाला. अश्विनने त्याच्या अर्धशतकी खेळीत ३३ धावांवर मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेतला. मात्र त्याचे शतक होऊ शकले नाही. अश्विन आणि आर. साईकिशोर यांच्यातील आठव्या गडय़ासाठीची भागीदारी १०५ धावांवर संपुष्टात आल्यानंतर मुंबईने पुढील दोन बळी सहज टिपत तमिळनाडूचा पहिला डाव ३२४ धावांवर संपुष्टात आणला आणि १६४ धावांची आघाडी घेतली. तुषार देशपांडे आणि रॉयस्टन डायस यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात तमिळनाडूची अवस्था १ बाद ४८ अशी झाली असताना दोन्ही संघांनी सामना अनिर्णीत राखण्याचा निर्णय घेतला. मुंबईचे आता चार सामन्यांतून ९ गुण झाले आहेत. मुंबईचे प्रशिक्षक विनायक सामंत यांनी खेळपट्टी धीमी असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘‘४८८ ही आमची धावसंख्या चांगली होती. मात्र खेळपट्टी धीमी होती. तरीदेखील पहिल्या डावात आघाडी मिळाल्याने आनंद आहे,’’ असे विनायक सामंत यांनी सांगितले.

महाराष्ट्राचा झारखंडवर विजय

नागोठणे येथे सुरू असलेल्या सामन्यात महाराष्ट्राने चौथ्या दिवशी झारखंडचा दुसरा डाव ३११ धावांवर संपुष्टात आणत विजयासाठीचे ४८ धावांचे लक्ष्य दोन गडय़ांच्या मोबदल्यात पार करून विजय साकारला. सत्यजीत बच्छाव आणि मुकेश चौधरी यांनी झारखंडच्या डावाला खिंडार पाडले. पण सौरभ तिवारी आणि कुमार सूरज यांनी पाचव्या गडय़ासाठी १३९ धावांची भागीदारी रचत झारखंडचा डाव सावरला. तिवारीने ८७ तर सूरजने ९२ धावा फटकावल्या. बच्छावने चार तर चौधरीने तीन बळी मिळवले. विजयी उद्दिष्ट गाठताना नौशाद शेखने नाबाद २६ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव): १४८.४ षटकांत सर्वबाद ४८८ विरुद्ध तमिळनाडू (पहिला डाव) : १५६.४ षटकांत सर्वबाद ३२४ (अश्विन ७९, कौशिक गांधी ६०; शाम्स मुलानी ४/७२) आणि (दुसरा डाव) : २२ षटकांत १ बाद ४८.