राहुल द्रविडची फलंदाजी म्हणजे फलंदाजीची कार्यशाळा होती. तंत्राबरोबर एकाग्रता, संयम, चिकाटी काय असते याचे धडे द्रविडकडून नवोदित खेळाडूंनीच नाहीतर क्रिकेटरसिकांनी घेऊन दैनंदिन जीवनात आचरणात आणले असतील. जसा त्याचा खेळ तसेच त्याचे समालोचन. भावनेच्या आहारी न जाता खेळाचे साल हळूहळू उघडून आतील गाभ्यापर्यंत नेणे हे द्रविड अफलातून करतो. बऱ्याचदा त्याची फलंदाजीच्या व्यवस्थापनातील तत्त्वे हर्ष भोगलेसारख्या व्यवस्थापन गुरूलादेखील स्तिमित करतात. त्यामुळे जेव्हा द्रविड म्हणतो, की भारतीय गोलंदाजीचे काही खरे नाही, तेव्हा त्याचे म्हणणे शंभर टक्के खरे आहे हे मानले पाहिजे.
भारतात जलदगती गोलंदाजांची खाण कधीच नव्हती. चार-पाच वर्षांत एखादा चांगल्या दर्जाचा मीडियम पेसर तयार व्हायचा. कपिलनंतर श्रीनाथ, प्रसाद आणि नंतर झहीर खान असे चांगले गोलंदाज तयार झाले. महत्त्वाची गोष्ट अशी, की या गोलंदाजांनी एकहाती सामने जिंकून दिले नाहीत. त्यांना मौल्यवान साथ मिळायची ती चांगल्या स्पीनर्सची. वेंकटपथी राजू, राजेश चौहान, कुंबळे, हरभजन यांचा वाटा फार महत्त्वाचा असायचा. नंतर नंतर कुंबळे आणि हरभजनने अनेक एकहाती विजय मिळवून दिले. परदेशात गांगुलीच्या नेतृत्वाखाली जे विजय मिळाले त्यात श्रीनाथ, आगरकर, नेहरा, कुंबळे, झहीर, हरभजन यांचा एकत्रित पराक्रम असायचा. द्रविड म्हणतो त्याप्रमाणे सध्या आपल्याकडे सातत्याने चांगली गोलंदाजी करणारे जलद गोलंदाज नाहीत आणि उत्कृष्ट कौशल्य असलेले स्पीनर्ससुद्धा नाहीत. अशा परिस्थितीत अगतिक आणि व्याकूळ होऊन आपण  काही गोलंदाजांना प्रथमश्रेणीचा फारसा अनुभव नसताना निवडले. पण ती चाल यशस्वी झाली नाही. महंमद शमी, भुवनेश कच्चे गडी आहेत हे सिद्ध झाले. ज्यांना थोडा अनुभव आहे ते सुधारत नाहीयेत, ही खरी शोकांतिका आहे. उमेश यादव मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होता. ईशांतही होता. दोघांनीही या चार कसोटी सामन्यांत काही केले नाही. हे लोक सुधारतच नाहीयेत. अश्विनला अजून ऑफ स्टंप लाइन पकडता येत नाही. का बरं असं व्हावं? आकलनाच्या पलीकडे आहे. त्यामुळे द्रविडची चिंता रास्त आहे.
याउलट गोलंदाजांच्या बाबतीत पाकिस्तानचे नशीब बा. भ. बोरकरांच्या  कवितेसारखे आहे-
जेथे होईल माध्यान्ह तेथे पान वाढलेले
काळोखात कुणीतरी ज्योत घेऊन आलेले
पाकिस्तानने जादूगाराने टोपीवरून हात फिरवून कबूतर बाहेर काढावे तसे अप्रतिम गोलंदाज पेश केले. त्यांचे नशीब असे की ते त्यांना विनासायास मिळाले. अक्रम, वकार यांना इम्रानने गल्ली क्रिकेटमधून उचलून थेट पाकिस्तान संघात आणले. प्रथमश्रेणीचा वीतभर अनुभव नसताना या पोरासोरांनी हातभर बॉल स्विंग केला. अकिब जावेद, सलीम जाफर, अझीम हफीज (उजव्या हाताला दोन बोटे कमी असलेला) असे एकसोएक हिरे इम्रानने असेच उचलून थेट संघात आणले. या सर्वानी उत्तम कामगिरी केली. नंतरच्या काळात शोएब अख्तर, मोहम्मद आसिफ, उमर गूल यांनी फलंदाजांना घाम आणला.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला मोहम्मद आमिर सतराव्या वर्षी पाकिस्तान संघात येऊन दहशत निर्माण करू शकला. या सर्व गोलंदाजांमध्ये अजून एक वेगळेपण म्हणजे यातील अक्रम, जाफर, हफिज, अमिर डावखुरे. म्हणजे अजूनच वेगळेपण. या सर्व गोलंदाजांच्या अफाट नैसर्गिक गुणवत्तेमुळे गोलंदाजी हा पाकिस्तानचा कायम सशक्त विभाग राहिला. हे गोलंदाजीचं पाकिस्तानमध्ये वेगळं बेट आहे का, हे पाहायला हवं. म्हणजे काश्मीरच्या बदल्यात ते घ्यायला हवं, असं मी म्हणत नाहीये बरं का!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com