भारताचा ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत एका स्थानाने आगेकूच करताना सातवे स्थान मिळवले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांच्या क्रमवारीतील अव्वल स्थान अबाधित राखले आहे. गोलंदाजांच्या यादीत कॅगिसो रबाडा अग्रस्थानावर आहे.

इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो, बांगलादेशचा मॉमिनूल हक आणि पाकिस्तानचा यासिर शाह यांनी आपापल्या संघांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावताना क्रमवारीत लक्षणीय मजल मारली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या विजयात शतकी योगदान देणाऱ्या बेअरस्टोने सहा स्थानांनी सुधारणा करीत १६ वे स्थान मिळवले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयातील कामगिरीमुळे मॉमिनूलने ११ स्थानांनी आगेकूच करताना २४ वे स्थान प्राप्त केले आहे. यासिरनेही न्यूझीलंडविरुद्धच्या विजयात चोख भूमिका वठवताना नऊ स्थानांनी पुढे जात १०वे स्थान मिळवले आहे.