करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभर गंभीर वातावरण आहे. केंद्र सरकारने परिस्थितीचा सामना करण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र प्रत्येक दिवशी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करानो बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. आतापर्यंत देशभरात १०० पेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. बीसीसीआयनेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखत आयपीएलसह आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. या लॉकडाऊनच्या काळात भारतीय खेळाडू आपल्या घरात राहत परिवारासोबत वेळ घालवत आहेत. तर काही खेळाडू सोशल मीडियावर एकमेकांशी लाईव्ह चॅटद्वारे गप्पा मारत आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि माजी खेळाडू युवराज सिंह यांनी नुकत्याच इन्स्टाग्रामवर गप्पा मारल्या.

या गप्पांमध्ये रोहित शर्माने टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतची पाठराखण केली. २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देऊन पंतला संघात स्थान दिलं. मात्र आपल्याला मिळालेल्या संधीचा पंतला फायदा उचलता आला नाही. यष्टीरक्षक आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात त्याची कामगिरी ढिसाळच राहिलेली आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांत पंतवर सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून टीकेची झोड उठवण्यात आली होती. मात्र रोहित शर्माच्या मते प्रसारमाध्यमं पंतवर अति टीका करत आहेत.

“मी नेहमी ऋषभची बोलत असतो. तो आताशी २०-२१ वयाचा आहे…त्याच्यावर अति प्रमाणात टीका होत आलेली आहे ज्यामुळे तो नेहमी दडपणाखाली असतो. प्रसारमाध्यमांना असं वाटत असतं की एखाद्या खेळाडूबद्दल लिहीणं हा त्यांच्या कामाचा एक भाग आहे…मात्र एखाद्या खेळाडूबद्दल लिहीताना जरा विचार करायला हवा कारण याचा त्याच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम होऊ शकतो”, रोहितने ऋषभची पाठराखण केली. दरम्यान १५ एप्रिलनंतर आयपीएल स्पर्धा खेळवली जाईल की नाही याबद्दलही अद्याप शाश्वती नाहीये. मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल खेळवण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.